अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दबावानंतर कंपनीचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता, अॅपल भारतात आयफोनचे उत्पादन सुरू ठेवणार आहे. भारतातील आयफोन उत्पादनांचा कंपनीला खूप फायदा होईल. म्हणूनच कंपनी कोणत्याही राजकीय दबावाखाली कोणताही निर्णय घेणार नाही, अशी माहिती कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिली. ट्रम्प प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला न जुमानता अॅपल नफ्याला प्राधान्य देईल असा त्यांना विश्वास आहे. अॅपल कंपनी भारतात उपलब्ध असलेल्या प्रतिभेवर आणि येथे व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. सध्या भारतात मुंबई आणि दिल्ली येथे अॅपल कंपनीचे दोन प्लान्ट असून त्याचा विस्तार करण्याचा कंपनीचा विचार आहे.
अमेरिकेत विकले जाणारे आयफोन भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नव्हे तर अमेरिकेतच बनवले पाहिजेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले होते. जर अॅपल अमेरिकेत आयफोन बनवत नसेल तर कंपनीवर किमान 25 टक्के टॅरिफ लादला जाईल, असे ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले होते. अॅपल कंपनीची उत्पादन केंद्रे प्रामुख्याने चीनमध्ये आहेत. मात्र, आता भारताने अधिक व्यावसायिक सवलती देऊ केल्याने चीनमधील आपल्या उत्पादन व्यवसायाचा मोठा भाग भारतात आणण्याचा अॅपलचा प्रयत्न आहे. भारतानेही यासाठी अनुकूल वातावरण स्थापित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या आपल्या आयफोनच्या उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन ही कंपनी भारतात करते. आगामी काही महिन्यांमध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत वाढविले जाणार आहे. आपली भारतातील विस्ताराची योजना मागे घेण्यात आलेली नाही, असे आत्ताही अॅपलने स्पष्ट केल्याने हे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.









