एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी : विस्ताराचा फायदा उठवणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयफोन निर्माती अॅपल भारतात लवकरच आपले क्रेडिट कार्ड सादर करण्याची योजना आखत आहे. ‘अॅपल कार्ड’ नावाने कंपनी क्रेडिट कार्ड लाँच करणार आहे, अशी माहिती मिळते आहे. भारतात हे कार्ड सादर करण्यासाठी अॅपल कंपनी एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करण्याची शक्यता सांगितली जात आहे. पण याबाबत दोघांकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अॅपलचे सीईओ टीम कुक हे अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी कुक यांनी एचडीएफसी बँकेचे सीईओ एम. डी. शशीधर जगदीशन यांच्याशी भागीदारीबाबत चर्चा केली होती, असेही कळते आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतील ही कंपनी कार्डधारकांना उशीरा रक्कम भरल्यास कोणतेही जास्तीचे शुल्क आकारत नाही. हेच धोरण अॅपलकडून भविष्यात आपले क्रेडिट कार्ड करु शकली तर राबवले जाणार असल्याचे समजते.
मिळणार कार्डवर लाभ
दुसरीकडे अॅपल कार्डच्या माध्यमातून कंपनीची उत्पादने खरेदी करायची झाल्यास त्यावर कॅशबॅक आणि तातडीने सवलतीची रक्कम ग्राहकांच्या खात्यात कंपनीकडून भरली जाणार आहे. अॅपलच्या अधिकाऱ्यांनी कार्डबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची कुणकुण आहे. कार्ड सादरीकरणासाठी योग्य त्या नियमांचे अनुसरण करुनच प्रक्रिया पार पाडावी असे आरबीआयने अॅपलला सुचवल्याचे सांगितले जाते.
…यांचेही क्रेडिट कार्ड
सध्या अॅपलचे क्रेडिट कार्ड फक्त अमेरिकेतच वापरात आहे. हे कार्ड कंपनीने गोल्डमॅन सॅक्स व मास्टरकार्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून लाँच केलेले आहे. याआधी पाहिल्यास अॅमेझॉन आणि सॅमसंग यांनीही भारतात आपले कार्ड सादर केले आहे. गुगलनेही आपले कार्ड लाँच केले आहे.
योजना फळाला येणार
गेल्या काही वर्षापासून अॅपल ही कंपनी भारतावर लक्ष पेंद्रीत करत आहे. भारतातच उत्पादन बनवण्यावर कंपनीचा भर असणार असून आयफोनची अलीकडे केलेली विक्रमी निर्यात कंपनीचा उत्साह द्विगुणीत करणारी ठरली आहे. मे महिन्यात 12 हजार कोटींचे स्मार्टफोन भारतातून निर्यात झाले आहेत. सोबत अॅपलची स्टोअर्स सुरु झाली असून तेथेही विक्रीतून चांगला महसूल कंपनीने प्राप्त केलाय. हे पाहता अशावेळेला भारतात कंपनीला क्रेडिट कार्ड सादर करण्याची योजना नक्कीच भविष्यात फळाला येईल, असे कंपनीला वाटते आहे.









