वृत्तसंस्था/नवी दिल्ली
स्मार्ट फोन्स बनविणारी विश्वविख्यात कंपनी अॅपल भारतात आपला विस्तार करण्याचा कार्यक्रम पुढे चालविणार आहे. या कंपनीने भारतात आपला विस्तार करु नये, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला होता. तथापि, अॅपल कंपनीची साहाय्यक कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने भारतात आयफोनची जुळणी करण्यासाठी 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय मागे घेतला जाणार नाही, हे नुकतेच स्पष्ट पेले आहे.
भारतातील आपल्या उत्पादन केंद्रांमध्ये अधिक गुंतणूक करण्याची योजना फॉक्सकॉनने सज्ज केली आहे. तशी सूचना या कंपनीने लंडन येथील शेअरबाजारालाही दिली आहे. भारतात तामिळनाडू येथे या कंपनीची युझान टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड नामक उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे, त्यासाठी दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती या कंपनीकडून नुकतीच दिली गेली आहे.
भारतात व्यवसाय हलविणार
अॅपल कंपनीची उत्पादन केंद्रे प्रामुख्याने चीनमध्ये आहेत. मात्र, आता भारताने अधिक व्यावसायिक सवलती देऊ केल्याने चीनमधील आपल्या उत्पादन व्यवसायाचा मोठा भाग भारतात आणण्याचा अॅपलचा प्रयत्न आहे. भारतानेही यासाठी अनुकूल वातावरण स्थापित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या आपल्या आयफोनच्या उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन ही कंपनी भारतात करते. आगामी काही महिन्यांमध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत वाढविले जाणार आहे.
ट्रंप यांनी काय म्हटले होते
भारतात करांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अॅपलने भारतात आपला व्यवसाय वाढवू नये. या कंपनीने अमेरिकेत आपला व्यवसाय वाढवावा. भारताच्या उच्च कर आकारणीमुळे अमेरिकेला आर्थिक हानी सहन करावी लागते. अॅपलने हे लक्षात घ्यावे. अॅपल कंपनीला अमेरिकेने अतिशय चांगली वागणूक दिली आहे. या कंपनीने भारताची चिंता करु नये. भारत आपले हितरक्षण करण्यास समर्थ आहे. अॅपलने ते उत्तरदायित्व स्वीकारण्याचे कारण नाही, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी अॅपलचे टीम कुक यांना दिला होता. मात्र, भारतात व्यवसाय आणि पुरवठा साखळी विस्ताराची योजना मागे घेतली जाणार नाही, असे ट्रंप यांच्या विधानानंतर अॅपलच्या भारतातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. आपली भारतातील विस्ताराची योजना मागे घेण्यात आलेली नाही, असे आत्ताही अॅपलने स्पष्ट केल्याने हे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.









