2024 मधील कामगिरी : 12.8 अब्ज डॉलर्सचे आयफोन्स निर्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन निर्माती दिग्गज कंपनी अॅपलने भारतात आपली कामगिरी चांगली केली आहे. गेल्या वर्षी 12.8 अब्ज डॉलर्सचे आयफोन भारतामधून कंपनीने निर्यात केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकंदर 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तचे आयफोन्स निर्यात करण्यात आले आहेत.
अॅपलने 2024 मध्ये भारतातून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या आयफोन्सची निर्यात केली असल्याची माहिती उपलब्ध होते आहे. ही निर्यात आतापर्यंतची विक्रमी स्तरावरची असल्याचे सांगितले जात आहे. वर्षाच्या आधारावर पाहता निर्यातीत कंपनीने वर्षाच्या आधारावर पाहता 42 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. स्थानिक स्तरावरील उत्पादनांची निर्मिती आणि सेवा यामध्ये सुधारणा केल्यामुळे आयफोनच्या निर्यातीमध्ये कंपनीला वाढ करता आली आहे. जानेवारी ते डिसेंबरच्या कालावधीत उत्पादन 46 टक्के इतके वाढले आहे.
2023 मधील निर्यात स्थिती
कंपनीने 2023 मध्ये 9 अब्ज डॉलर्सच्या किमतीचे आयफोन निर्यात केले होते. त्याच कालावधीमध्ये कंपनीने 12 अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सची एकंदर निर्मिती केली होती. कंपनी पीएलआय योजनेअंतर्गतचा लाभ उठवत आयफोन्सची निर्मिती करते आहे. कंपनी आपल्या पुरवठा साखळी कंपन्यांचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न करत आहे. आगामी काळात देशामध्ये आयफोनच्या उत्पादनामध्ये वाढ केली जाऊ शकते.
नवे उत्पादन उद्दिष्ट
आगामी काही वर्षांमध्येच कंपनीला आयफोनचे उत्पादनदेखील 30 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवायचे आहे. असे शक्य झाल्यास जागतिक आयफोन उत्पादनामध्ये भारताची सध्याची असणारी 14 टक्के हिस्सेदारी 26 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्याच्या काळात पाहता भारत हा अॅपलसाठी पाचवी मोठी बाजारपेठ आहे. देशांतर्गत पातळीवर फोनची विक्री 20 टक्के इतकी वाढण्याची शक्यता असून 15 दशलक्ष आयफोन्स विकले जाण्याची शक्यता सांगितली जात आहे.









