निर्यातीतही मारली बाजी : पीएलआय योजनेचा कंपनी घेते लाभ
नवी दिल्ली : आयफोन निर्माती कंपनी अॅपलने भारतात 10 अब्ज डॉलर्सच्या आयफोनची निर्मिती करण्यामध्ये यश मिळवले आहे. लक्षात घ्या की, हे उद्दिष्ट कंपनीने अवघ्या 7 महिन्यांमध्ये साध्य केले आहे. केंद्र सरकारने सवलतीसाठी जाहीर केलेल्या पीएलआय (उत्पादन प्रोत्साहन सवलत)योजनेचा लाभ अॅपल कंपनीने पूर्णपणे उठवत भारतातच आयफोन निर्मितीला सुरुवात केली आहे. यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 10 अब्ज डॉलर्सच्या आयफोन उत्पादनाचा टप्पा गाठण्यात आला असून यातही 7 अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सची निर्यात करण्यात आली आहे.
किती अब्जची केली निर्यात
2023-24 आर्थिक वर्षात भारतामध्ये एकंदर 14 अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्मिती करण्यात आले होते. यापैकी 10 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचे आयफोन्स अन्य देशांना निर्यात केले गेले होते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर अॅपलचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. केवळ 7 महिन्यातच अॅपलने गाठलेल्या यशाबाबत कंपनीचे त्यांनी कौतुक केले आहे.
रोजगारात महिलांना संधी
गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीने एक लाख 75 हजार इतके प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध केले असून यामध्ये प्रामुख्याने महिलांचे प्रमाण अधिक ठेवले आहे. जवळपास 72 टक्के इतके प्रमाण कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांचे आहे.









