वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलमध्ये गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांत सामना खेळवला गेला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान, अॅपलचे सीईओ टीम कूक यांनाही आयपीएलचा सामना पाहण्याचा मोह आवरता आला नाही आणि ते थेट स्टेडिअमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. टीम कूक यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, तिचा पती आनंद आहुजासह उपस्थित होती. सोनमने सोशल मीडियावर कूक यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्याचा त्यांनी आनंद घेतल्याचे फोटोत दिसत आहे. क्रिकेटचे किती महत्त्व आहे हे मला आत्ता कळले, अशी प्रतिक्रिया टीम कूक यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान कूक यांनी आयपीएलचा सामना पाहिला होता.









