जागेचा वाद मिटण्याची शक्यता, मुस्लिम समाज व ग्रामस्थांची बैठक संपन्न
कुंभोज प्रतिनिधी
कुंभोज बाजारपेठेला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे, वादग्रस्त जागेचा वाद आज गावातील प्रमुख मान्यवर व मुस्लिम समाज, जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने मिटण्याची शक्यता असून, मुस्लिम समाज व ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली आहे. परिणामी कुंभोज ग्रामस्थांनी रविवारी होणारा बाजार बंदचे आव्हान ग्रामस्थांना केले होते तसेच सदर बाजार हा वादग्रस्त जागेतच भरवणार ही भूमिका घेतल्याने सदर जागेवरती आज पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते जवळ जवळ 100 पेक्षा जास्त पोलीस सदर घटनास्थळी उपस्थित होते.
कुंभोज (ता.हातकणंगले) येथील गट नंबर १९०३ या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र ४ हेक्टर ०६ आर असे यापैकी अंदाजे ०.८० आर जमीन पूर्वीपासून आजतागायत पडसर व खुली अशा स्थितीत आहे. उर्वरित जागेत गावतलाव अस्तित्वात आहे.सदरची जमीन ही ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकी व कब्जे वहिवाटीची असून प्रस्तुतची मिळकत ग्रामपंचायत कुंभोज यांना दि. ३०/०९/१९५५ साली फेरफार नंबर ५३१९ याप्रमाणे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कब्जे वहीवाटीत मिळाली आहे. या प्रकरणाची सर्व सातबारे, फेरफार उतारे, आदेश व गावात बाजार भरविण्या संदर्भात सद्यस्थितीला येणाऱ्या समस्या व अडचणी जिल्हाधिकारी यांना निवेदनासहित सादर केलेले आहेत. परंतु आजअखेर या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे कुंभोज ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला चार दिवस झाले बसले आहेत. जोपर्यंत कुंभोज ग्रामपंचायतीच्या मागणीला सकारात्मक आदेश पारित करीत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरू राहणार असल्याचे सरपंच जयश्री जाधव व उपसरपंच अजित देवमोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आहे.
आंदोलनाच्या चोथा दिवशी उपसरपंच अजित देवमोरे व माजी उपसरपंच दाविद घाटगे यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये हालवण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य भरतेश्वर भोकरे यांची देखील तब्येत खालावली आहे. परिणामी ग्रामपंचायत सदस्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असल्याची चर्चा कुंभोज ग्रामस्थातून होत असून गावातील एकी व सलोखा अशाच पद्धतीने कायमस्वरूपी रहावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत होत आहे. परिणामी सदर जागेच्या मोबदल्यात मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी अन्यत्र जागा जिल्हाधिकारी व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून देणार असल्याची चर्चा ही सध्या जोर धरत आहे.









