कचऱ्याची विल्हेवाट वेळीच लावण्याची मागणी
येळ्ळूर : रस्त्यावर कचरा टाकण्याच्या नागरिकांच्या सवयीमुळे स्वच्छ भारत या योजनेला हरताळ फासल्याचे चित्र केएलई व बळ्ळारी नाला दरम्यान येळ्ळूर रस्त्याच्या बाजुला साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दिसत आहे. यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असून सदर कचऱ्याची विल्हेवाट वेळीच लावावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील पदार्थ पावसामुळे कुजून परिसराला उकीरड्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यातील दुर्गंधीमुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरिकांसह सकाळ, संध्याकाळ फिरायला जाणाऱ्यांना याचा त्रास होत आहे.
उकीरड्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शिवाय ही कुत्री आपल्यावर हल्ला करतील की काय, या भीतीमुळे येथून ये-जा करताना जीव मुठीत घेवूनच ये-जा करावी लागते. या परिसरात केएलई हॉस्पिटल असून येथे उपचाराला येणाऱ्यांची आणि प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यामुळे दुर्गंधीचा आणि कुत्र्यांचा त्रास येथील नागरिकांना नेहमीच होत असतो. याआधी अनगोळ, आनंदनगर परिसरातील येणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारा त्रास कुठे बंद होतो न होतो तोच या कचऱ्याच्या नवीन समस्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. कचरा फेकणाऱ्या नागरिकांनीही कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावून हा परिसर स्वच्छ ठेवावा व नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ बंद करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









