मालवण / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आरक्षित समाज घटकांतील नागरिकांची एक व्यापक व खुली विचारसभा येत्या रविवार दिनांक ८ ॲाक्टो.रोजी सायं.४.००वा. कुडाळ येथील मराठा समाज सभागृह(तळमजला)येथे आयोजित करण्यात आली आहे.
देशभरात सध्या ओबिसींच्या आरक्षणाचा विषय मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.त्याच वेळी जातनिहाय जनगणना या विषयावर संपुर्ण जनमानसात वैचारीक घुसळण सुरू झाली आहे.महाराष्ट्रात मराठा समाजासाठीच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणत्याही आरक्षित समाज वर्गाचा आक्षेप नाही.तर देशाच्या उर्वरीत राज्यात धनगर समाजाला आरक्षण मिळत असतांना महाराष्ट्रात मात्र धनगर आरक्षणाचं घोंगडं कित्येक वर्ष तसंच भिजत ठेवण्यात आलं आहे
.या आणि या संबंधाने देशभरात घडत असलेल्या अशा सर्व घटनांबाबत आपल्या सिंधुदुर्गातीलओ.बी.सी.,.बी.सी.,एस्.सी.,एस्.टी.,एन्.टी.,एस्.बी.सी., व्हीजे१-२-३ आदी सर्व आरक्षित समाज घटकांचे जिल्ह्याचे म्हणून एक सर्मसमावेशक धोरण निश्चित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून ही बैठक आयोजित होत आहे.त्याच प्रमाणे आरक्षणा बाबत मुळात संवैधानिक आरक्षणाच्या लाभार्थ्यातच असलेल्या गैरसमजाचे निराकरणही या बैठकीत केले जाणार आहे.
आरक्षित प्रवर्गात मोडणाऱ्या सिंधुदुर्गातील सर्व ज्ञाती संघटनांच्या जिल्हा व तालुका समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत निमंत्रीत करण्यात आले आहे.त्याही पलिकडे आरक्षणाच्या टिकवून ठेवण्याच्या कामी आपले योगदान देऊ इच्छिणाऱ्या सर्वच समाधुरीणींनीही आपली भुमिका मांडण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्गच्या वतीने सर्वश्री आनंद मेस्री,काका कुडाळकर,सुनिल भोगटे,रमण वायंगणकर,नंदन वेंगुर्लेकर,बाळासाहेब बोर्डेकर,नितीन वाळके,महेश परूळेकर,महेश अंधारी,वंदन वेंगुर्लेकर,सौ.साक्षी वंजारी आदींनी केले आहे.









