प्रलोभने, दडपशाहीला न डगमगता निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडा : एकीची वज्रमूठ भक्कम करा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या 66 वर्षांपासून महाराष्ट्रात विलिन होण्यासाठी प्राणपणाने संघर्ष करीत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेची होणारी निवडणूक कसोटीची ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न प्रलंबित आहे. ते लक्षात घेऊन आज होणाऱ्या मतदानाच्या रणधुमाळीत आपण आपला पवित्र हक्क बजावून जे आपले आहे ते कर्तव्य पार पाडा. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्वश्री रमाकांत कोंडुस्कर, अमर येळ्ळुरकर, आर. एम. चौगुले, मुरलीधर पाटील आणि मारुती नाईक या पाच उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले आहे. आमचा लढा कन्नड भाषिकांविरुद्ध मुळीच नाही तर केंद्र सरकारने घेतलेल्या अन्यायी भूमिकेच्या विरुद्ध आहे. 1957 पासून 2003 पर्यंत म. ए. समितीने सनदशीर मार्गाचा अवलंब केला. आतापर्यंतचे पंतप्रधान आणि सर्वपक्षीय केंद्रीय नेत्यांबरोबर चर्चा, शिष्टमंडळे यांचे या सारखे मार्ग अवलंबविले. मुंबई येथेही विधिमंडळाची दार ठोठावण्यात आली. त्यातूनही मार्ग न सुटल्याने अखेरीस 2004 मध्ये हा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्यादृष्टीने आपली बाजू भक्कम करावयाची असेल तर म. ए. समितीला विजय मिळवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठीच आज आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. यावेळी कधी नव्हे ते एकीची वज्रमूठ भक्कम झालेली आहे आणि तरुण वर्गही या लढ्यात सहभागी झालेला आहे. त्यांनीही आपला हक्क बजावलाच पाहिजे. पुढील भवितव्याच्या दृष्टीने आपण गाफील राहून चालणार नाही. प्रलोभने, दडपशाही न जुमानता निभर्यपणे मतदान करावे, असेही म. ए. समितीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
मतदानाला जाताय? यापैकी एक ओळखपत्र सोबत घ्या
मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी मतदान नाकारले जावू नये या हेतूने निवडणूक आयोगाने कोणती ओळखपत्रे चालतील याची यादी दिली आहे. त्यानुसार…1. आधारकार्ड, 2. मनरेगा जॉब कार्ड, 3. पासबुक (ज्यावर बँक किंवा पोस्ट खात्याने मान्य केलेले छायाचित्र हवे), 4. आरोग्य विमा कार्ड (हेल्थ इन्शुरन्स कार्ड-ज्याला कामगार खात्याने मान्यता दिली आहे.), 5. वाहन परवाना, 6. पॅनकार्ड, 7. आरजीआयने मंजूर केलेले स्मार्टकार्ड, 8. भारतीय पासपोर्ट, 9. केंद्र, राज्य सरकार, पब्लीक लि. कंपन्या यांनी दिलेले कर्मचारी ओळखपत्र, 10. दिव्यांग कार्ड.









