महापालिकेच्यावतीने शहरात जनजागृती : मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते चालना
प्रतिनिधी/ बेळगाव
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरावर प्रत्येकाने निर्बंध घालणे गरजेचे आहे. यासाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. यासाठी महापालिकेच्यावतीने शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे फेरीचे उद्घाटन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिक वापराविरोधात महापालिकेने मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक जप्त करण्याबरोबरच दंडात्मक कारवाई केली आहे. याचबरोबर आता प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शनिवारी शहरातील विविध भागांमध्ये ही जनजागृती करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिकविरोधी मोहीम राबविल्यानंतर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. प्रथम जनजागृती करावी, त्यानंतर प्लास्टिकविरोधी मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता महापालिकेच्यावतीने कापडी पिशव्या तसेच खराब होणारे प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील काकतीवेस, खडेबाजार, कॉलेज रोड यासह इतर परिसरातही जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्याचबरोबर कचऱ्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. तेव्हा प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा, असे आवाहन महापालिकेचे कर्मचारी करत होते.
प्लास्टिक जप्त; 8 हजार 500 रुपये दंड वसूल
शहरामध्ये विविध ठिकाणी धाडी टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले. याचबरोबर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी 12 किलो प्लास्टिक जप्त करून 8 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी दिली.









