@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकसभेच्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव करुन निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राहुल गांधींच्या पदयात्रेस सहभागी होण्याचे आवाहन काँगेसकडून करण्यात आले आहे. या पक्षाचे नेते दीपक सिंग यांनी गुरुवारी इराणी यांना आमंत्रणपत्र दिले. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना करण्यात यावे अशा सूचना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केल्या आहेत. तथापि, स्मृती इराणी यांना सर्वप्रथम आमंत्रण द्यावे असे आपल्याला वाटले, म्हणून ते देण्यात आले आहे, असे दीपक सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
स्मृती इराणींना निमंत्रण देणे हा काँगेसच्या डावपेचांचा भाग आहे. मुळात राहुल गांधींची ही यात्राच एक राजकीय स्टंट आहे. भारतात कोणतीही फूट नाही. स्वतः राहुल गांधींनीच भारतात कोठेही ‘नफरत’ आपल्याला दिसली नाही, अशी कबुलीच दिली आहे. मग या पदयात्रेचे काही प्रयोजनच उरत नाही. त्यामुळे केवळ राजकीय कारणांसाठी आणि स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा एक प्रयत्न म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे. तसेच मृत्यूपंथाला लागलेल्या काँगेसला जगविण्याचा हा एक प्रयत्न आहे, अशी टीका भाजप नेते दुर्गेश त्रिपाठी यांनी केली.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेथी मतदारसंघात पराभूत केले आहे, याची जाणीव काँगेसने ठेवावयास हवी. गांधी त्या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले होते. अशा स्थितीत काँगेसने इराणी यांना निमंत्रण देणे, हे कुत्सित मनोवृत्तीचे लक्षण आहे, अशा अर्थाची टीकाही भाजपकडून करण्यात आली.









