झिरो पॉईंट निश्चितीनंतरच कामाला सुरुवात करा
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे बेळगाव परिसरातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करण्यात आली. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. महामार्ग प्रशासनाने झिरो पॉईंट निश्चित न करताच न्यायालयाचा अवमान करत रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करून हलगा-मच्छे बायपास रद्द करावा, या मागणीसाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी साकडे घातले.
शनिवारी कॅम्प येथे शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. झिरो पॉईंट निश्चितीबाबतचा खटला न्यायालयात सुरू असतानाच घाईगडबडीने आदेश डावलून रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतीविना शेतकरी बेरोजगार होत असल्याची तक्रार पवार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी त्यांनी महामार्ग प्रशासनाच्या झिरो पॉईंट, तसेच भू-संपादनाची सर्व कागदपत्रे देण्याची सूचना केली.
यावेळी रयत संघटनेचे राजू मरवे, परशराम सनदी, अमित अनगोळकर, महेश चतूर, हणमंत बाळेकुंद्री, सुभाष चौगुले, सुरेश मऱ्याकाचे, भैरू कंग्राळकर, गोपाळ सोमणाचे यांसह इतर शेतकरी उपस्थित होते.









