जिल्हाधिकारी राहुल रेखावार : पंचगंगेमध्ये गणेश विसर्जन न करण्याचे इचलकरंजीसह जिल्हावासियांना आवाहन : आमदार प्रकाश आवाडेंनी भूमिका बदलणे योग्य नाही
प्रतिनिधी/कोल्हापूर
पंचगंगा नदीला धार्मिक व पर्यावरणीयदृष्टया खूप महत्व आहे. त्यामुळे या नदीला गणेश विसर्जनाच्या माध्यमातून प्रदुषित करण्याचा प्रयत्न करणे निंदनीय आहे. या उलट हे प्रदुषण होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी इचलकरंजीसह जिल्हावासीयांना शुक्रवारी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. तसेच इचलकरंजीच्या गणेश विसर्जनाबाबत प्रशासनाच्या भूमिकेला सहमती दर्शविणारे आमदार प्रकाश आवाडे नंतर भूमिका बदलत असतील तर ते योग्य नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. सरकारने दिलेल्या विशेष सवलतीमध्ये हा उत्सव उत्साहाने साजरा होत आहे. इथून मागे कोल्हापूरने या उत्सवाच्या माध्यमातून राज्याला सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशा पध्दतीने साजरा होईल, असा संदेश देण्यात कोल्हापूर अग्रभागी आहे.
इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधी व गणेश मंडळांनी पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची भूमिका घेतली आहे. ही अनाठायी व तार्किक नाही. गणेश विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे अशी कोणतीही संकल्पना दिसून येत नाही. काही ठिकाणी नदीच नाही तेथे विहीरी, विसर्जन कुंडांमध्ये गणेश विसर्जन होतच आहे. त्यामुळे इचलकरंजीवासीयांनी पंचगंगेत गणेश विसर्जन करुन प्रदुषण करण्याचा प्रयत्न करु नये. इचलकरंजीसह जिल्हावासीयांनी विसर्जन कुंडांमध्ये गणेश विसर्जन करावे. कोल्हापूरवासीयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुन राज्याला व देशाला एक आदर्श देऊया.
ते पुढे म्हणाले, गेल्या आठवड्य़ात गणेश विसर्जनासंदर्भात इचलकरंजी महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आवाडेंसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रशासनाने विसर्जनासाठी केलेली व्यवस्था अपुरी पडल्यास पंचगंगा नदीत गणेश विसर्जन करावे, अशी भूमिका आमदार आवाडे यांनी मांडली होती. त्यावर प्रशासनानेही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पंचगंगा नदीत विसर्जनाला मान्यता देईल, असे म्हंटले होते. परंतु आमदार आवाडे आता स्वतःच घेतलेली भूमिका बदलत असतील तर ते योग्य नाही.
गणेश विसर्जनाचे गाव व शहर पातळीवर योग्य नियोजन
गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने गावपातळीवर व शहरात प्रभागनिहाय विसर्जन कुंडांचे नियोजन केले आहे. पाण्याच्या स्त्रोतामध्ये गणेश विसर्जन झाल्यास प्रदुषण होऊन धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाने स्पर्धा सुरु केल्या आहेत, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग सर्वमान्य असेल
कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग हा पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन गणेश मंडळांशी चर्चा करुनच निश्चित करेल. हा विसर्जन मार्ग सर्वांना मान्य होईल असाच असेल. दोन वर्षानंतर उत्साहात हा उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेश मंडळ व भक्तांच्या सोयीचे नियोजन करण्यास प्रशासन कोठेही कमी पडणार नाही. तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.