कॉम्रेड संपत देसाई, राजेंद्र कांबळे यांचे आवाहन
सावंतवाडी-
नागपूरहून निघणारा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेर्ले , पारपोली, फ़णसवडे , असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा असा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या सहापदरी महामार्गामुळे तालुक्यातील हजारो एकर जमीन जाणार असून पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे. मुळात आपला तालुका हा पश्चिम घाटाच्या अतिसंवेदनशील पट्ट्यात येतो. केंद्र शासनाने पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समितीने हा प्रदेश इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केला आहे.असे असताना हा महामार्ग कशासाठी असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. जैवविविधतेने समृध्द असलेला हा प्रदेश शक्तीपीठ महामार्गमुळे उध्वस्त होणार आहे. दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती कायमच्या नष्ट होणार आहेत. त्यामुळे सर्व शक्तीनिशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षणाला विरोध करून सर्वेक्षण हाणून पाडले पाहिजे असे आवाहन कॉम्रेड संपत देसाई, राजेंद्र कांबळे च यांनी केले आहे . कोल्हापूर सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर येथील शेतकरी महामार्ग विरोधी लढ्यात मोठ्या संख्येने उतरले आहेत. या महमार्गाने बाधित होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या सर्व्हेक्षणाला विरोध करून हाणून पाडावे असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई व वन हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.









