ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपयांचा धनादेश देत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्यावेळी बोलतानाअमित शाह म्हणाले, आज दिल्लीहून फक्त अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव करण्यासाठी मी येथे आलो आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकाच्या सन्मान सोहळ्यासाठी आलेला हा इतका मोठा जनसागर मी पहिल्यांदाच पाहतोय. इतक्या कडक उन्हात बसलेले तुम्ही सर्वजण हेच सांगतात की तुमच्या मनात अप्पासाहेब यांच्यासाठी किती प्रेम, सन्मान आणि श्रद्धा आहे. असा मान, सन्मान, श्रद्धा ही फक्त त्याग, समर्पण आणि सेवेतूनच मिळते. तुमचं प्रेम, विश्वास हाच अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारे दिपस्तंभ म्हणजे धर्माधिकारी कुटुंब आहे. भरकटलेल्या लाखो कुटुंबाना दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं. त्यामध्ये माझेही कुटुंब होतं. माझ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यावेळी आनंद दिघे यांनी आधार दिला. तर आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे मोठे योगदान मी कधीही विसरू शकणार नाही. मी मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात आहे, यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून बोलत आहे. सूर्य आग ओकत असतानाही लाखेंच्या संख्येने जमलेल्या लोकांमधील एकही माणूस जागेवरुन उठत नाही. अप्पासाहेबांची हीच जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचे हे उदाहरण आहे.








