मुख्यमंत्र्यांची घोषणा / सर्वपक्षीय सदस्यांची सहमती
प्रतिनिधी / पणजी
टॅक्सीचालक डिजिटल मीटर बसवूनही वापरत नाहीत. त्यामुळे पर्यटकांची फसवणूक होते. ऑपरेटर त्यांचे मीटर बंद ठेवतात. त्यामुळे यापुढे राज्यात मोबाईल ऍप आधारित टॅक्सी सेवा सुरू करणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरेल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. लवकरच सरकार राज्यात ऍप-आधारित टॅक्सी सेवा सुरू करेल अशी घोषणा त्यांनी केली.
आमदार डिलायला लोबो यांनी विचारलेल्या संबंधित प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. त्याचबरोबर यासाठी प्रत्येक आमदाराने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत गोव्यात ऍप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यास स्वतः टॅक्सी चालक संघटनेचाच विरोध होत होता. मात्र काल विधानसभेत झालेल्या या चर्चेनंतर सर्व सदस्यांची सहमती मिळाल्याने लवकरच ही सेवा सुरू होईल यावर शिक्कामोर्तब झाले.
पर्यटकांची फसवणूक होतेच
सध्यस्थितीत राज्यात 9457 टॅक्सी मालक आहेत. त्यापैकी 2268 ऑपरेटरर्सनी टॅक्सी मीटरसाठी अनुदानासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 1824 जणांना प्रत्येकी 11 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. परंतु अनेकजण आजही या मीटरचा वापरच करत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यटकांची फसवणूक व्हायची ती होतच आहे. अशावेळी अनुदान देऊन काय उपयोग, असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला.
त्यावर बोलताना आमदार लोबो यांनी, कुणा एकाच्या चुकीसाठी सरकारने सर्वांना वेठीस धरू नये. जे चालक मीटर वापरत नाहीत त्यांना कठोर दंड द्यावा, असे सूचविले. मात्र ते तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसले तरीही वाहतूक खात्यातर्फे पुढील आठवडय़ापासून राज्यभर कारवाई सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर ऍप आधारित टॅक्सी सेवा हाच उपाय असल्याचे ते म्हणाले. आमदार विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हिएगश, कार्लुस फरेरा, युरी आलेमाव आदींनी या चर्चेत भाग घेतला.









