तारा सुतारिया मुख्य भूमिकेत
स्टुडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या तारा सुतारियाने अत्यंत कमी कालावधीत स्वत:च्या अभिनयाद्वारे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तारा सुतारिया लवकरच सर्वाइवल थ्रिलर ‘अपूर्वा’द्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अपूर्वाचा ट्रेलर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारने अपूर्वाचा ट्रेलर सादर केला आहे. यात अपूर्वा ही मुख्य भूमिका ताराने साकारली आहे. सिद्धार्थ नावाच्या एका युवकासोबत विवाह करण्याची तयारी सुरू असताना अपूर्वाचे काही गुंडांकडून अपहरण केले जाते. या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी अपूर्वा कशाप्रकारे संघर्ष करते हे यात दिसून येणार आहे. तारा सुतारियासोबत ‘अपूर्वा’मध्ये अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव आणि धैर्या करवा यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.
दिग्दर्शक निखिल भट्ट यांच्या दिग्दर्शनता तयार ‘अपूर्वा’ चित्रपटाच्या ट्रेलरची मोठी चर्चा होत आहे. ताराचा यातील अभिनय प्रभावित करणारा असल्याचे बोलले जात आहे. ताराचा हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे. ताराला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहे. स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून देण्याची संधी ताराला यामुळे मिळाली आहे. तारा अन् कार्तिक आर्यन हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे देखील तारा सध्या चर्चेत आहे.









