मुंबई-गोवा चौपदरीकरणावर राज्यसभेत भाष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या कित्येक वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामकाजावर बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामकाजावर भाष्य करताना मलाही अपराधीपणा वाटतो, असे गडकरी म्हणाले. या वर्षाच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण चौपदरीकरण सहा महिन्यात पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांची ही घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही.
मध्यप्रदेशचे भाजप खासदार अजय प्रतापसिंह यांनी मध्यप्रदेशमधील एका महामार्गासंबंधी मुद्दा उपस्थित केला. भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना संपूर्ण देशात आणि जगभरात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे, असे खासदार म्हणाले. त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मलाही अपराधीपणा वाटतो. देशातील मुंबई ते गोवा आणि सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल, असे गडकरी म्हणाले. या उत्तरावर सभापती जगदीप धनखड यांनाही हसू आवरले नाही.









