बिहारमधील कार्यक्रमात गोंधळ : ‘जय श्रीराम’च्या घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणामधील एका कार्यक्रमात लोकगायिका देवी यांना ‘ईश्वर-अल्लाह तेरो नाम’ हे गीत गायन केल्यानंतर माफी मागावी लागली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवी यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘अटल बिहारी वाजपेयी अमर रहे’च्या घोषणा दिल्या. यानंतर त्यांनी ‘ईश्वर-अल्लाह तेरो नाम’ हे भजन गायले तेव्हा सभागृहात उपस्थित लोक संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याने गोंधळ निर्माण झाला. याचदरम्यान आयोजकांना जाब विचारल्यानंतर गायिकेने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वातावरण निवळले.
पाटणा येथील बापू सभागृहात भारतरत्न मदन मोहन मालवीय यांची जयंती आणि माजी भारतरत्न पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायिका देवी यांना या कार्यक्रमात सादरीकरणासाठी बोलावण्यात आले होते. यादरम्यान देवी यांनी गांधीजींचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ गाण्यास सुरुवात केली. हे भजन गात असताना देवींनी ‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ हे गीत गायल्याने सभागृहात उपस्थित लोक संतप्त झाले. या प्रकारावरून आता जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.









