नगरगाव आंबेडे येथे आश्रम प्रकल्पाचे उद्घाटन
वाळपई /प्रतिनिधी
कौटुंबिक विस्कटलेली घडीमुळे आजही समाजामध्ये गोरगरीब जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे. संघर्षमय जीवन जगताना त्यांची परिस्थिती हालाखीची बनत आहे. अशा गोरगरीब, बेवारस, बेघरांना नगरगाव येथील अपना घर आश्रमाच्या माध्यमातून आसरा मिळणार आहे. हे कार्य खरोखरच ईश्वराप्रति समर्पित करण्यासारखे असल्याचे प्रतिपादन नगरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पुरुषोत्तम खाडिलकर यांनी केले आहे.
नगरगाव आंबेडे या ठिकाणी अपना घर आश्रम प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात झाले. डॉ. ब्रिज मोहन भारद्वाज व डॉ. माधुरी भारद्वाज यांच्या सहकार्याने सदर आश्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा राज्याचे माजी आमदार मोहन आमशेकर, स्थानिक पंच राजेंद्र अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते म्हाळू गावस यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मोहन आमशेकर म्हणाले, या सामाजिक प्रकल्पासाठी महादेव कासार यांनी आपली जमीन दान केलेली आहे. संतोष महानंदू नाईक यांनी सांगितले की आजारी, बेघर, गरिबांसाठी हा आश्रम सुरू केला आहे. या आश्रमामध्ये सातत्याने वैद्यकीय तपासणी, मोफत आहार, कपडे उपलब्ध केले जातील. यासाठी सामाजिक तत्त्वावर आपल्यापरीने सहकार्याचे पाठबळ देणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी संतोष महानंद नाईक यांनी केले.
सध्या आश्रमात 30 खाटांची क्षमता आहे. लवकरच ती 50 पर्यंत करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी संस्था चालकांनी स्पष्ट केलेले आहे.
सुरुवातीला पारंपारिक समई प्रज्वलित करून या आश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या आश्रमात आश्रय घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुष्पमाला अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले.









