अनेक गाळे धूळखात : खासगी भाजी मार्केटचा परिणाम
बेळगाव : शहरात खासगी भाजीमार्केट सुरू होणे, भाजी आयातीच्या प्रमाणात घट व इतर कारणांमुळे एपीएमसी येथील भाजीमार्केट ओस पडले आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नेहमी गजबजणाऱ्या एपीएमसी भाजी मार्केटमधील गर्दी रोडावली आहे. जिल्ह्यातील मुख्य एपीएमसीपैकी एक असलेल्या बेळगाव शहरातील एपीएमसीचे क्षेत्रफळ 83 एकर इतके आहे. सध्या या भाजीमार्केटमध्ये भाजीपाला बाजारात काही किरकोळ व्यापार आणि धान्य विक्री वगळता व्यवसाय अपेक्षित पातळीवर चालत नाही. त्यामुळे येथील अनेक गाळे धूळखात पडून आहेत. 2021-22 मध्ये एपीएमसीला 4.07 कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रमोशन असिस्टटन्स) कायदा लागू झाल्यानंतर तो 3.70 कोटी रुपयांवर आला. तथापि, मार्च 2024 मध्ये राज्य सरकारने सुधारित एपीएमसी कायदा मागे घेतला. ज्यामुळे महसूल संकलनात वाढ झाली आहे. येथील एपीएमसीत राज्यातील विविध जिल्ह्यामधून नव्हे तर परराज्यातूनही कांदा, बटाटे, रताळी खरेदी करण्यासाठी लोक येतात. त्यामुळे सरकारने येथील एपीएमसीत शीतगृहे सुविधा बांधण्यास मान्यता दिली आहे.
एपीएमसी परिसर बनले कुत्र्यांचे आश्रयस्थान
एपीएमसी भाजी मार्केटमध्ये 250 गाळे आहेत. त्यापैकी 90 गाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व गाळे वापरता येत नाहीत. याठिकाणी घाऊक भाजीपाला व्यापार होत नसल्याने काही ग्राहक किरकोळ स्वरुपात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात. एपीएमसी परिसरात कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेले भाजी मार्केटचे गाळे धूळखात आहेत. 2016 मध्ये एपीएमसी परिसरात 1 हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधले आहे. यासाठी अंदाजे 85 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण हे गोदाम आजपर्यंत वापरले गेले नाही. देखभालीअभावी गोदाम जीर्ण झाले आहे. तसेच शेतकरी भवनदेखील कुलूपबंद आहे. परिणामी हा परिसर कुत्र्यांचे आश्रयस्थान बनला आहे.









