एकाला अटक, पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त : चोरीची चोरट्याकडून कबुली
बेळगाव : आझमनगर येथील फ्लॅटमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सोमवार दि. 28 रोजी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तौसिकअहमद मुकुतमसाब सिंपी (वय 30 रा. फ्लॅट नं. 5, मून लाईट अपार्टमेंट, आझमनगर आठवा क्रॉस, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 7 लाख 78 हजार 673 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आझमनगर येथील अपार्टमेंटमध्ये 23 एप्रिल रोजी फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी इमरान अब्दुलसत्तार चांदवाले यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. चोरट्याने त्यांच्या फ्लॅटमधील सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत वरील संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक उस्मान अवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









