नागरिकांनी विलिंगनेस करणे अनिवार्य : ग्राम वन, बेळगाव वनमध्ये सुविधा उपलब्ध
बेळगाव : एपीएल रेशनकार्डधारक रेशनपासून वंचित आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना मोफत तर एपीएल कार्डधारकांना प्रतिकिलो 15 रुपयांप्रमाणे रेशन धान्य वितरित करणे अनिवार्य आहे. मात्र बहुतांश रेशन दुकानांतून एपीएल कार्डधारकांना रेशनविना माघारी धाडले जात आहे. जिल्ह्यातील अंत्योदय आणि बीपीएल कार्डबरोबरच एपीएल कार्डधारकांची संख्याही मोठी आहे. मागील दोन वर्षांपासून अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र एपीएल कार्डधारकांना पैसे देऊनदेखील रेशन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सरकारकडून अन्नभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदूळ देण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र पुरेशा साठ्याअभावी तांदळाऐवजी निधी दिला जात आहे. सद्यस्थितीत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि 170 रुपये दिले जात आहेत. मात्र एपीएल कार्डधारकांना या सुविधेपासून वंचित रहावे लागले आहे. शिवाय पैसे देऊनदेखील एपीएल कार्डधारकांना रेशन मिळेनासे झाले आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एपीएल कार्डधारकांनी प्रथमत: विलिंगनेस करणे (इच्छा नोंदविणे) आवश्यक आहे. ग्राम वनच्या सॉफ्टवेअरमध्ये विलिंगनेस सेवा उपलब्ध आहे. एपीएल लाभार्थ्यांनी विलिंगनेस करून रेशन सुविधेचा लाभ घ्यावा. अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर एपीएल कार्डधारकांनाही प्रतिकिलो 15 रुपये दराने धान्य वितरण करणे आवश्यक आहे. मात्र काही एपीएल कार्डधारकांचे विलिंगनेस नसल्याने अडचणी येत आहेत. यासाठी विलिंगनेस करणे आवश्यक आहे.
एपीएल कार्डधारकांना विलिंगनेस गरजेचे
एपीएल कार्डधारकांनी रेशन हवे असल्यास बेळगाव वन किंवा ग्राम वनमध्ये जाऊन विलिंगनेस करणे गरजेचे आहे. यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत विलिंगनेसचे काम थांबले आहे. मात्र लवकरच कामाला सुरुवात होईल. त्यानंतर लाभार्थ्यांनी विलिंगनेस करून रेशनचा लाभ घ्यावा.
– श्रीशैल कंकणवाडी, सहसंचालक, अन्न व नागरी पुरवठा विभाग









