मड बाथसारखी सुविधा असलेले गाव
राजस्थानात एक गाव केवळ हत्तींसाठी वसविण्यात आले आहे. जयपूरमध्येच एक गाव असून तेथे सुमारे 80 हत्ती आहेत. या गावात या हत्तींसाठी रितसर 1 बीएचके आणि 2 बीएचके सारखे क्वाटर्स तयार करण्यात आले आहेत. हत्तींच्या गावात हत्तीसाठी तलाव, मडबाथ, रुग्णालय यासारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.
जयपूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आमेर किल्ल्यानजीकच हत्ती गाव वसविण्यात आले आहे. येथे हत्तींकरता सर्व व्यवस्था असून देशविदेशातून पर्यटक येथे येत असतात. एलिफेंट व्हिलेज म्हणून पर्यटक हत्तीसफारीचा आनंद घेतात. पर्यटकांना हत्तींच्या जीवनशैलीला जवळून जाणण्याची संधी देखील मिळते. येथे हत्तींची देखरेख करण्यासाठी माहुतांचे परिवारही हत्तींच्या नजीकच राहतात. त्यांचे पालनपोषण देखील हत्तींवरच निर्भर असते. हे परिवार केवळ हत्तींच्या सान्निध्यात जगत असतात.
भारताच्या एकमात्र हत्ती गावात 80 च्या आसपास हत्ती आणि तितकीच माहुतांची कुटुंबं राहत आहेत. एका हत्तीची माहुताचा एक परिवार देखभाल करत असतो. तर माणसांप्रमाणेच या हत्तींना लक्ष्मी, चमेली, रुपा, चंचल यासारखी नावे देण्यात आली आहेत. तर विशेष ओळखीसाठी हत्तींच्या कानाखाली मायक्रोचिप बसविण्यात आली आहे. तर हवामानानुसार हत्तींना महिन्यातील 15 दिवस सुटी मिळते आणि हिवाळा-उन्हाळा आणि पावसाळ्यानुसार त्यांना अन्न दिले जाते.
हत्ती गावात हत्तींसाठी जवळपास 20 ब्लॉक आहेत. हत्तींसाठी स्टोरेज रुमसोबत माहुताची खोली देखील असते, जेणेकरून हत्तींची दिवसरात्र देखभाल होऊ शकेल. राज्य सरकारने या गावातील हत्तींची वाढती संख्या पाहता 2010 मध्ये याला एलिफेंट व्हिलेज घोषित केले होते. 2010 मध्ये 100 एकरमध्ये हे गाव वसविण्यात आले होते.









