लक्ष देण्याची गरज, अनेकांना करावी लागतेय भटकंती : शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका : उपाययोजना आवश्यक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. बेळगाव तालुकाही याला अपवाद नाही. बेळगाव तालुक्मयातही काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तब्बल आठवड्यातून एकदा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारने मोठा निधी उपलब्ध केला आहे. पण जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून पाण्यासाठी कोणत्याच ठोस अशा योजना राबविण्यात आल्या नाहीत. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्मयातील बऱ्याच गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही गावात तर बऱ्याच दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने ते दूषित असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. गावांमध्येही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होतच असते. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांचे या गावांच्या समस्यांकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असते. मात्र वारंवार होणाऱ्या या समस्यांकडे उपाय करण्यावर प्रशासन का लक्ष देत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
बहुतांश कूपनलिका वाया गेल्यातच जमा
सध्या तालुक्मयात विविध योजनांतर्गत कूपनलिका खोदाईचे काम सुरू आहे. यामधील काही कूपनलिकांना पाणी लागले असून उर्वरित कूपनलिका वाया गेल्याचेच दिसत आहे. यामुळे भू-जल पातळी किती खालावली आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. येत्या काही वर्षांत अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याची दाहकता अधिकच गंभीर होणार आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या गावांना कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांमधून पाणी सोडून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर टँकरनेही पाणीपुरवठा केला जातो. पण बेळगाव तालुक्यात अशाप्रकारे मोठी नदी नसल्याने नेहमीच पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी या तालुक्यांमधील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली नाही, असे अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, पाण्यासंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तब्बल दोन महिन्यांआधीच बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे.
पाण्यासंदर्भात कायमस्वरुपी तोडग्याची गरज
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर काही गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. जिह्यातील काही गावांना मात्र दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कायमस्वऊपी तोडगा काढणे गरजेचे आहे. योजना राबविताना भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे.
जे जे शक्य ते ते करतोय-हर्षल भोयर
य् ााबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना याबाबत विचारले असता पाणी समस्या सोडविण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर कूपनलिका, विहिरी व इतर जलस्रोतांचा आधार घेत पाणी समस्या सोडविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून यापुढेही ते राहणार असल्याचे सांगितले.









