राजकारणात कुणाला चांगले म्हणावे आणि कुणाला वाईट हे ठरवता येऊ नये अशी अत्यंत गलिच्छ, किळसवाणी व अभूतपूर्व अवस्था निर्माण झाली आहे. मतदारांना आपले प्रतिनिधी परत बोलवायचा हक्क असता तर काय झाले असते सांगता येत नाही. उजवे, डावे, पुरोगामी, प्रतिगामी, हिंदुत्वनिष्ठ यांचे तोंडावळे व भाषा वेगवेगळया असल्या तरी सारे एकाच माळेचे मणी व सारे लक्ष्मीदास, सत्तापिपासू आहेत. हे महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. मग त्यासाठी निवडणूकपूर्व युती मोडण्यापासून ऑपरेशन कमळपर्यंत आणि तोंडात एक भाषा व अंडरडिलींग वेगळेच करणारे नेते व खोकी, डोकी, फुटाफुटी,पक्ष पळवणे, बाप पळवणे, प्रवक्ते नावाखाली विखारी व्देष पसरवणारे असा सारा चिखल झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला असे म्हटले ते खोटे नाही आणि चिखलात कमळ फुलले असे कुणाला वाटत असले तरी तेही खरे नाही. अवघे मराठीजन निवडणुकीची वाट पहात आहेत. तोंडाळ, खोटे, स्वार्थी, विचारशून्य, विवेकशून्य आणि लक्ष्मीदास यांना लोक उत्तम पर्याय शोधत आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत विधानसभेचा चेहरा बदलला तर आश्चर्य नको. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे बुधवारी शक्तीप्रदर्शन झाले. तेथे अजित पवारांच्या सभेला 32 आमदार उपस्थित होते तर शरद पवारांच्या सभेला 16 आमदार उपस्थित होते. वरवर अजितदादांनी शक्ती दाखवली आणि जोरदार भाषण करत घरातले, पक्षातले आणि बंद दारामागचे अनेक प्रसंग सांगत निवृत्त व्हायचे नव्हते तर राजीनामा दिला कशाला असा खडा सवाल शरद पवारांना विचारला. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाटचालीचा आढावा घेत आजही आम्ही शरद पवारांना मानतो आमचे चुकले तर कान धरायचा त्यांचा अधिकार आहे पण त्यांनी आता पक्ष नवीन पिढीकडे सोपवून निवृत्त व्हायला हवे. कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यायला हवा असे सांगत शरद पवार यांना थांबायचे कुठे हे कळाले नाही असे सुनावयाला कमी केले नाही. आपणास महाराष्ट्र घडवायचा आहे. आमदारांची, लोकांची कामे करायची आहेत. मोदीच 2024 ची निवडणूक जिंकणार असे शरद पवार खासगीत सांगतात मग मोदींच्या सोबत जायला काय हरकत आहे. भाजपाला आपण बाहेरुन पाठींबा दिला होता.पुलोदमध्ये जनसंघ होता. शिवसेनेला तुम्ही धर्मवादी म्हणून टाळत होता. सन 2019 च्या निकालानंतर एका उद्योगपतींच्या घरात भाजपा बरोबर सरकार स्थापन करायचे म्हणून चार बैठका घेतल्या असे सांगत अठरा पक्षाची आघाडी त्यातील मतांतरे, नेतृत्त्व अशा सर्वांचा आढावा घेत त्यांनी शरद पवार यांना आपणास आशीर्वाद द्या असे केलेले आवाहन म्हणजे शरद पवारांच्या राजकीय वाटचालीचा लेखाजोखाच होता. शरद पवार यांनी वाय.बी.सेंटरमध्ये सभा घेतली. त्यात मोदी व भाजपावर टिका होती व राष्ट्रवादीतून गेलेल्या मंडळीचे नाणे चालत नाही म्हणून ते आपला फोटो वापरतात असे म्हटले, गेलेल्यांना जावू द्या. आपण पुन्हा नव्याने बांधणी करु, असे म्हणत राष्ट्रवादीचे संख्याबळ त्यांच्यासोबत उरलेले नाही यांची जणू कबुलीच दिली. पक्षाचे नाव, चिन्ह आपण सोडणार नाही, असेही त्यांनी सुचित केले. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचीही भाषणे झाली पण ती माझा बाप, माझा विठ्ठल अशा थाटाची होती. गेले वर्षभर शिवसेनेची वाट लावून देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे राजकीय सूड घेतला. आता पवारांच्या घरात व पक्षात उभी फूट पाडून त्यांनी शरद पवारांना नामोहरम केले. शरद पवार राष्ट्रीय राजकारणात महाआघाडीचा महाराष्ट्र प्रयोग करणार होते पण त्यांना आता पक्ष व चिन्ह वाचविण्याची व नव्याने संघटना बांधणीची वेळ या वयात आली आहे. सुडाचे व हिशोबांचे राजकारण तात्पुरते चांगले वाटत असले तरी त्यात व्यापकहित नसते.
राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो, पण आज काही नेते, पक्ष एकमेकांना पाण्यात पहात आहेत. गलिच्छ टीका करत आहेत. अजूनही हे सारे व चिखलफेक थांबणारी नाही. भाजपाला महाराष्ट्रात एक दमदार मराठा चेहरा नेतृत्त्वासाठी हवा आहे, हे लपून राहिलेले नाही. राधाकृष्ण विखेपासून, चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भाजपा नेतृत्वाने शक्ती देऊन पाहिली पण महाराष्ट्र जिंकायची शाश्वती दिसली नाही. भाजपा आता अजितदादा, एकनाथराव शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना एकत्रीत शक्ती
देवून आगामी विधानसभा, लोकसभा, मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू, असे धोरण आखून फासे टाकत आहे. विधीमंडळाचे व संसदेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. केंद्रातील व राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार व्हायचा आहे. केंद्रात प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळेल. राष्ट्रवादीच्या फुटाफुटीत त्यांचा व देशातील उद्योगलॉबीचा मोठा हात होता. मंत्रीमंडळ विस्तारात केंद्रात एकनाथ शिंदे गटालाही स्थान मिळेल. सुप्रिया सुळे व देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होतील, अशी एक चर्चा आहे. पण त्यास आधार नाही भाजपाची आमदार संख्या 105 आहे. त्यातील अनेकजण मंत्री होण्यासाठी, महामंडळावर वर्णी लागण्यासाठी उतावीळ आहेत. त्यांची नाराजी भाजपला महागात पडू शकते. कारण हे सर्वही राजकारणीच आहेत. सत्तेकडे सत्ता आणि पैशाकडे पैसा जातो पण प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे फुटले कसे यांचे कोडे कोणालाच कळालेले नाही आणि त्यांचे स्पष्ट उत्तर आहे. सत्तेसाठी काहीही. शरद पवारांना साथ देऊन मोठी मोठी नावे घेवून मतदारांची, मतदारसंघाची कामे होणार नाहीत आणि चौकशीचा ससेमिरा थांबणार नाही. सत्ता महत्त्वाची. सत्ता मिळाली की सर्व साधते त्यामुळे केंद्रातून निधी आणि राज्यातील कामे मार्गी लागतात, त्यासाठी कुणीही काहीही करायला तयार आहे. राजकारणाने घसरणीचा तळ गाठला असे कुणाला वाटत असेल तर तो मात्र भ्रम ठरेल. पुढे पुढे काय होते ते दिसेलच. पण पेरले तेच उगवते आणि शिकवले तेच शिकले जाते. यांचा अनुभव शरद पवारांसह अनेकजण घेत आहेत. आता खरी राष्ट्रवादी, पात्र, अपात्र हा लढा राष्ट्रवादीत सुरु होईल.








