काही जणांना पाळीव प्राण्यांचे भलतेच वेड असते, हे आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेले आहे. आपण पाळलेल्या प्राण्यांना सुखात ठेवण्यासाठी असे लोक कोणत्याही पातळीला जाण्यास सज्ज असतात. चीनमध्ये शिंग जिलेई नामक एक युट्यूबर आहे. त्याला मांजरांचे प्रचंड वेड आहे. त्याने आपल्या घरात अनेक मांजरे पाळली आहेत. तो नेहमी त्यांच्या सुखासमाधानात जगता यावे, म्हणून धडपडत असतो. मांजरे म्हणजे जणू घरातील लहान मुलेच आहेत असे त्याला वाटते. त्याने आपल्या मांजरांसाठी कल्पनातीत सुविधा निर्माण केल्या आहेत.
त्याने आपल्या घरातच मांजरांसाठी एक मेट्रो स्टेशन बनविले आहे. हे अगदी खऱ्याखुऱ्या मेट्रो स्थानकाप्रमाणे आहे. मांजरांसाठी मेट्रो गाडीही त्याच्या घरात धावते. ती स्थानकावर थांबली, की मांजरे तिच्यात शिरतात. ती पुढच्या स्थानकावर थांबली, की काही मांजरे तिच्यातून उतरतात आणि काही नवी मांजरे चढतात. दिवसभर हा खेळ चालत राहतो. मांजरांनाही आता या खेळाची सवय झाल्याने ती मेट्रोची वाटच पहात असतात. जिलेई याला ही मेट्रो आणि तिचे स्थानक घरच्या घरी बनविण्यासाठी चार महिने लागले. या व्यवस्थेत केवळ मेट्रो आणि स्थानक नाही, तर एक चालू स्थितीतील एक्सकलेटरही आहे. ही सर्व व्यवस्था स्वयंचलित आहे. आता या व्यवस्थेला मांजरेही सवयीने चांगला प्रतिसाद देऊ लागली आहेत.
आपल्या मांजरांसाठी केवळ एवढेच करुन तो थांबलेला नाही. तर त्याने घरच्या घरी त्यांच्यासाठी एक ‘सुपरमार्केट’ही बनविलेले आहे. त्यासमवेत एक स्पा आणि एक गॅरेजची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आता या सुविधांचा उपयोग त्याची लाडकी मांजरे अशा प्रकारे करतात, हे समजू शकलेले नाही. पण या साऱ्या खटाटोपातून त्याचे मांजरप्रेम जगजाहीर झालेले आहे. त्याने स्वत:च आपल्या व्हिडीओ चॅनेलवर या साऱ्याचे व्हिडीओ टाकलेले आहेत. आपल्या पाळीव मांजरांसाठी इतके सारे करण्याची कल्पना त्याला सुचली तरी कशी आणि या साऱ्याचा उपयोग काय आहे, या प्रश्नाला त्याने उत्तरही दिले आहे. मांजरांसाठी मेट्रो आणि या इतर साऱ्या सुविधा निर्माण करण्याची कल्पना त्याला त्याच्या युट्यूब वाहिनीच्या अनेक फॉलोअर्सकडून मिळाली असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या फॉलोअर्सनी त्याला यासंबंधी सूचना केल्या आणि त्यातून त्याला स्फूर्ती मिळाली. पाळीव मांजरे त्याची लाडकी आहेत, हे समजू शकते. पण माणसांसाऱ्या सुविधांचा त्यांना उपयोग तरी काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला देता येत नाही. ‘हौसेला मोल नसते’ या एकच वाक्प्रचारात हे उत्तर दडलेले आहे. हौसेसमोर प्रश्नही विचारयचे नसतात, हे देखील या घटनेवरुन समजून घेतले गेले पाहिजे.









