वृत्तसंस्था / वडोदरा
प्रत्येक हिंदू व्यक्तीला कोणत्याही मंदिरात जाऊन पूजाआर्चा करण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनी केले आहे. हिंदू समाजात आजही जातीयता आहे. सर्वांना सर्व मंदिरांमध्ये प्रवेश दिल्याने जातीयतेची तीव्रता सौम्य होण्यास साहाय्य होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी या संदर्भात समाजाचे प्रबोधन करावे आणि जातीप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी येथील कार्यक्रमात केले.
वडोदरा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांसमोर होसबाळे भाषण करीत होते. हिंदू समाज एकसंध करण्याची आज कधी नव्हे इतकी आवश्यकता आहे. समाजासमोर मोठी आव्हाने आहेत. त्यांच्याशी दोन हात केवळ एकसंधत्वाच्या माध्यमातूनच केले जाऊ शकतात. त्यामुळे हिंदूंनी जातीभेद विसरुन एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास हिंदू समाजाचे सामर्थ्य वाढणार असून संकटेही दूर हू शकतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजाला एकसंध करण्यासाठी स्वयंसेवकांना मोठे कार्य करता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.









