भोपाळ :
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला जबरदस्त यश मिळाले आहे. तर भाजपच्या या विजयामुळे विरोधी पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. मागील काही वर्षांपासून निवडणुकीचा निकाल लागल्यावर विरोधी पक्षांचे नेते ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयानंतर बसप अध्यक्ष मायावती यांनीही हा निकाल पचनी पडणारा नसल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चिपयुक्त कुठलीही मशीन हॅक केली जाऊ शकते. मी 2003 पासूनच ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध केला आहे. आम्ही भारतीय लोकशाहीला प्रोफेशनल हॅकर्सकडून नियंत्रित करण्याची अनुमती देऊ शकत नाही. हा मूलभूत प्रश्न असून यावर उपाय सर्व राजकीय पक्षांना करावा लागणार आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने आमच्या लोकशाहीचे रक्षण करावे असे उद्गार दिग्विजय यांनी काढले आहेत.









