खलिस्तानी कारवायांबद्दल ब्रिटनच्या पंतप्रधानांचे वक्तव्य :
वृत्तसंस्था/ लंडन
खलिस्तानी समर्थकांच्या ब्रिटनमधील वाढत्या कारवायांवर भारताकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खलिस्तान समर्थक कट्टरवादाविरोधात ब्रिटन भारत सरकारसोबत मिळून काम करत असल्याचे बुधवारी म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये कट्टरवादाचे कुठलेही स्वरुप स्वीकारार्ह नाही. हिंसक, फुटिरवादी विचारसरणींना रोखण्याच्या सरकारच्या कर्तव्याला मी अत्यंत गांभीर्याने घेतो, मग ती कुठलीही विचारसरणी असो असे उद्गार सुनक यांनी काढले आहेत.
2023 हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. भारताला अशाप्रकारे जागतिक नेतृत्व करताना पाहणे अद्भूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीदरम्यान जागतिक आव्हानांविषयी अणि त्यांना सामोरे जाण्यासंबंधी ब्रिटन अन् भारताच्या मोठ्या भूमिकेबद्दल चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. मी ब्रिटनचा पंतप्रधान झाल्यावर भारतीय लोकांची प्रतिक्रिया जबरदस्त अन् विनम्र होती असे सुनक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भारतासोबतच्या संबंधांचा गर्व
मला माझे भारतीय मूळ आणि भारतासोबतच्या स्वत:च्या संबंधांबद्दल अत्यंत गर्व आहे. माझी पत्नी भारतीय असून एक अभिमानी हिंदू या नात्याने मी भारत आणि भारतीय लोकांशी नेहमीच जोडलेला असणार आहे. मला माझ्या सासू-सासऱ्यांच्या (सुधा मूर्ती अन् नारायण मूर्ती) कामगिरीबद्दल गर्व आहे. त्यांनी शून्यातून जगातील सर्वात सर्वात सन्मानीय कंपनी निर्माण करण्याचा पल्ला गाठला असल्याचे उद्गार सुनक यांनी काढले आहेत.
जी-20 अध्यक्षत्वासाठी भारत योग्य
भारतातील वैविध्य अन् असाधारण यश पाहता जी-20 च्या अध्यक्षत्वासाठी भारत हाच देश योग्य आहे. जी-20 शिखर परिषद यशस्वी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना ब्रिटनचे समर्थन असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे. जगासमोर येणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही जी-20 च्या अध्यक्षत्वाच्या माध्यमातून भारतासोबत मिळून काम करणार आहोत. भारत पुढील 10 वर्षांच्या आत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. याचमुळे भारत अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचे सुनक यांनी नमूद केले आहे.
मुक्त व्यापार कराराचा मुद्दा
एक आधुनिक अन् दूरदर्शी मुक्त व्यापार करार आम्हाला 2030 पर्यंत ब्रिटन-भारत व्यापार दुप्पट करण्याच्या आमच्या संयुक्त महत्त्वाकांक्षेच्या मार्गावर वाटचाल करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. व्यापार कराराद्वारे भारतीय निर्यातदारांना ब्रिटनच्या बाजारपेठेत स्थान मिळविण्यास मदत होणार असल्याचे सुनक म्हणाले.









