मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याने मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी चित्ता प्रकल्पाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते. मागच्या तीन महिन्यांमध्ये तीन बछड्यांसह एकूण सहा चित्ते मरण पावले असून, तातडीने उपाययोजना न केल्यास या योजनेचे भवितव्यच धोक्यात येऊ शकते. मार्जार कुळातील अत्यंत चपळ प्राणी ही चित्त्याची ओळख. सडपातळ बांध्याचा चित्ता भक्ष्य पकडण्यासाठी ताशी 112 किमी वेगाने धावू शकतो, असे म्हणतात. एकेकाळी भारतीय भूमीवरही चित्त्यांची संख्या मुबलक असल्याचे सांगण्यात येते. तथापि, अधिवासाचा अभाव, वाढत्या शिकारी आणि काळवीट, ससे, सांबर यांसारख्या प्रमुख भक्ष्याची रोडावलेली संख्या यातून स्वातंत्र्योत्तर काळात भारतातून हा प्राणी नामशेष झाला. त्यानंतर पन्नासच्या दशकापासून भारतात पुन्हा चित्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. किंबहुना, या ना त्या कारणामुळे हे प्रयत्न प्रत्यक्षात आले नाहीत. कधी इराणमधील सत्तांतर त्याकरिता कारणीभूत ठरले, तर कधी आणखी काही. मोदी सरकारने मात्र या ‘चित्ता’कर्षक प्रकल्पाला मूर्त रूप देत एक पाऊल पुढे टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 5 मादी व 3 नर असे एकूण आठ चित्ते आणण्यात आले. चित्त्यांच्या आगमनाचा हा इव्हेंट मोठ्या वाजतगाजत साजरा करण्यात आला. पंतप्रधानांसाठी उभारलेला 10 फुटी मंच, त्याखालील पिंजरा, तो त्यांच्याकरवी उघडला जाताच कुनोच्या भूमीवर पाय ठेवणारे चित्ते, त्यानंतरची पंतप्रधानांची फोटोग्राफी हे तसे सगळेच चित्तवेधक ठरलेले. एखाद्या प्रकल्पाचे जबरदस्त मार्केटिंग त्याची कशी मुहूर्तमेढ रोवता येते, याचे हे उत्तम उदाहरण. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणून याच राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. काही दिवस विलगीकरणात ठेऊन त्यांना अधिवास क्षेत्रात हलविण्यात आले असले, तरी एकामागोमाग एक होणारे त्यांचे मृत्यू पाहता ही योजना यशस्वी होणार का, याविषयी निश्चितपणे शंका उत्पन्न झालेल्या दिसतात. नामिबियातून आणलेल्या साशा या मादीचे 27 मार्चला मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाल्यानंतर महिनाभरातच आफ्रिकेतून आलेल्या उदयचा हृदयाशी संबंधित विकाराने मृत्यू होतो काय नि पाठोपाठ दक्षा मादी तसेच ज्वाला मादीच्या तीन बछड्यांना जीव गमवावा लागतो काय, हे सारेच चिंताजनक म्हटले पाहिजे. वास्तविक ज्वाला मादीने चार बछड्यांना जन्म दिल्यानंतर या प्रकल्पाबाबतच्या आशा वाढल्या होत्या. तथापि, यातील तीन बछडे दगावण्याबरोबरच एकाची प्रकृती गंभीर होत असेल, तर नेमके कुठे चुकले, हे तपासले पाहिजे. तापमानवाढीचा परिणाम बछड्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मध्य भारतासह वेगवेगळ्या भागांतील 46 ते 47 पर्यंत पोहोचलेले कमाल तापमान पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. हवामान आणि प्रकृती हे दोन घटक परस्परांशी संबंधित असतात. नामिबिया व आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना शारीरिकदृष्ट्या येथील परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण होतेय का, अन्न वा आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात त्यांना काही अडचणी येत आहेत काय नि त्याचा त्यांच्या तब्येतीवर काही परिणाम तर होत नाही ना, हेही शोधले पाहिजे. जैवशास्त्रज्ञ डॉ. कार्तिकेयन यांनी नव्या वातावरणातून आणलेल्या चित्त्यांमध्ये प्रथिनांचा तसेच इतर प्रकारचाही संसर्ग होऊ शकतो. नि चित्ते संसर्ग सहन करू शकत नाहीत, अशी भीती व्यक्त केली होती. ती खरी होताना दिसते. चित्त्यांकरिता निश्चित केलेल्या अधिवासात वाघ, बिबटे, कुत्रे, मनुष्य आदी प्राणी नसावेत. त्याचबरोबर त्यांच्याकरिता पुरेसे भक्ष्य असावे, अशी मांडणी प्रसिद्ध संवर्धनतज्ञ डॉ. उल्हास कारंथ करतात. मुळात कुनोमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच तरस व जंगली कुत्रेही आहेत. स्वाभाविकच शिकारीतील वाटा हा कळीचा मुद्दा ठरतो. तर इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा काहीशा नाजूक असलेल्या चित्त्याला या तिघांशी होणाऱ्या संघर्षाचाही फटका बसू शकतो. त्यामुळे कुनो हा चित्त्यांसाठी आदर्श अधिवास ठरेल काय, याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. आजवरच्या ज्ञात इतिहासात कुंपण न घातलेल्या अभयारण्यात चित्त्यांना पुन्हा वसविण्याचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. दक्षिण अफ्रिकेत 15 वेळा असा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे भारतातही चित्त्यांच्या दोन ते तीन अधिवासांना कुंपण घालून बंदिस्त करणे आवश्यक असल्याचा सल्ला दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव तज्ञ विंसेंट वान डेर मर्व्ह यांनी दिला आहे. आगामी काळात कुनोमध्ये बिबटे व वाघांशी त्यांचा संघर्ष झडल्यास त्यात चित्त्यांचे अधिक प्रमाणात मृत्यू होऊ शकतात, असा इशाराही ते देतात. या सगळ्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. एखादी प्राणी परिसंस्था पुन्हा आणण्यासाठी किमान 20 प्राण्यांची गरज असते. पुढच्या पाच वर्षांत परदेशातून भारतात 40 चित्ते आणण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात आणलेले चित्तेच येथील वातावरणाशी जुळवून घेत नसतील, तर लगेचच घाई करून चालणार नाही. चित्त्यांच्या अधिवासाचा आढावा घेतला, तर वेगवेगळ्या तापमानात चित्ते राहत असल्याचे आढळते. तथापि, आशियाई व आफ्रिकी चित्त्यांमध्ये जनुकीय फरक आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. एखादा प्रकल्प सुरू करणे सोपे आहे. परंतु, तो तडीस नेण्यासाठी केवळ उत्साह पुरेसा नसतो. त्यासाठी सखोल अभ्यासाबरोबरच तज्ञांशी दीर्घ सल्लामसलत हवी. यापुढे ही पथ्ये पाळावीच लागतील.
Previous Articleपीव्ही सिंधू, प्रणॉय सेमीफायनलमध्ये
Next Article कृष्णजन्मभूमी प्रकरण उच्च न्यायालयाकडे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








