ब्रिटनमध्ये छोटे रस्ते-शहरांमध्ये वाहन चालविणारे अधिक नर्व्हस, 9 टक्के लोकांना श्वसनाचा त्रास
ब्रिटनमध्ये अलिकडेच झालेल्या एका संशोधनात एक तृतीयांशापेक्षा अधिक लोकांनी चिंतेमुळे आपले ड्रायव्हिंग प्रभावित होत असल्याचे म्हटले आहे. नर्व्हस होण्याचा प्रभाव वाहन चालविण्यावर दिसून येत असल्याचे निम्म्याहून अधिक लोकांचे म्हणणे आहे. चिंतेमुळे आपण वाहन चालविणेच टाळतो असे अनेक लोकांनी नमूद केले आहे. छोटे रस्ते आणि शहरांमध्ये वाहन चालविणारे लोक साधारणपणे अधिक नर्व्हस असतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. ब्रिटनच्या ड्रायव्हर अँड व्हेईकल लायसेंसिंग एजेन्सीच्या आकडेवारीच्या आधारावर सुमारे 1,414 जणांवर करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. ड्रायव्हिंगदरम्यान चिंतेत राहणाऱ्या लोकांपैकी एक तृतीयांश जणांनी यामुळे हार्टबीट वाढणे, घाबरून जाणे आणि घामाघूम होण्यासारख्या स्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. तर 9 टक्के लोकांना छातीत प्रचंड वेदना अन् श्वास घेताना त्रास होत असतो.
स्वत:ला शांत ठेवा
वाहन चालविताना चिंता वाटणे वाहनचालकांसोबत सर्वसामान्य लोकांसाठी देखील चिंताजनक ठरू शकते. अनेक लोक याच कारणामुळे वाहन चालविण्यास घाबरत असतात. अशा लोकांचा तणाव कमी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. स्वत:ला शांत करणाऱ्या पद्धतींद्वारे ड्रायव्हिंगमध्ये सुधारणा होऊ शकते असे या संशोधनाशी संबंधित लोर्ना व्हाली यांनी म्हटले आहे.
तरच रस्ते सुरक्षित
चिंतेचे कारण ओळखून त्याचे निवारण करणे आवश्यक आहे, कारण यामुळे लोकांना अधिक आत्मविश्वासपूर्ण चालक होण्यास मदत मिळणार आहे. याचा अर्थ चालक, पायी चालणारे लोक दोघांसाठीही रस्ते सुरक्षित होऊ शकतात असे व्हाली यांचे म्हणणे आहे.









