शाहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर निर्णय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अन्वर उल हक कक्कर यांची निवड झाली आहे. माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी बलुचिस्तानमधील अन्वर उल हक कक्कर यांच्या नावावर सहमती दर्शवली असून ते सूत्रे स्विकारण्यास राजी झाले आहेत. सध्या अन्वर उल हक यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला असला तरी लवकरच सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात येणार आहेत.
पाकिस्तानमध्ये 9 ऑगस्ट रोजी संसद विसर्जित केल्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला. अशा परिस्थितीत शनिवारी काळजीवाहू पंतप्रधान निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यापूर्वी, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून लवकरात लवकर नवीन काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्यास सांगितले होते.
पाकिस्तानची संसद म्हणजेच नॅशनल असेंब्ली बुधवारी रात्री कार्यकाळ संपण्यास 3 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना भंग करण्यात आली होती. नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ 12 ऑगस्टपर्यंत होता, परंतु त्यापूर्वीच संसदेचे सभागृह विसर्जित करण्यात आले. कार्यकाळ संपण्यापूर्वी असेंब्ली विसर्जित केल्यास निवडणूक 90 दिवसांमध्ये घेण्यात यावी अशी तरतूद पाकिस्तानच्या घटनेत आहे. तर दुसरीकडे कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या स्थितीत 60 दिवसांमध्ये निवडणूक घेण्याचे बंधन आहे. तथापि, देशात सध्या मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे निवडणुकीसाठी काही महिने उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.









