राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली शपथ
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
अन्वर उल हक काकर हे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान बनले आहेत. सोमवारी दुपारी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी काकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर हेही उपस्थित होते. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अन्वर उल हक काकर यांनी सूत्रे स्विकारली आहेत. माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी बलुचिस्तानमधील अन्वर काकर यांच्या नावावर सहमती दर्शवल्यानंतर त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. सध्या त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला असला तरी लवकरच सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी हालचाली गतिमान होणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला. अशा परिस्थितीत शनिवारी काळजीवाहू पंतप्रधान निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सोमवारी अन्वर काकर यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.









