वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कतारमध्ये 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघातील मध्यफळीत खेळणाऱ्या अन्वर अलीला दुखापतीमुळे सहभागी होता येणार नाही. अन्वर अलीच्या घोट्याला ही दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही.
23 वर्षीय अन्वर अलीच्या उजव्या पायाच्या घोट्याचे हाड मोडल्याने तो आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत खेळू शकणार नाही. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 50 सदस्यांचा संभाव्य संघ जाहिर केला आहे. अन्वर अलीच्या जागी आता जेक्सन सिंगला संधी देण्यात आली आहे. केरळच्या जेक्सन सिंगला खांद्याला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. पण या संभाव्य संघातून अंतिम 23 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 13 जानेवारीला ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. अन्वर अलीच्या गैरहजेरीत भारतीय संघाच्या बचाव फळीची जबाबदारी संदेश जिनगेन, प्रितम कोटल आणि सुभाशिस बोस यांच्यावर राहिल. फिफाच्या मानांकनात भारत सध्या 102 व्या स्थानावर आहे. एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाबरोबर 13 जानेवारीला, दुसरा सामना 18 जानेवारीला उझबेक बरोबर, तिसरा सामना 23 जानेवारीला सिरीया बरोबर होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या अंतिम 25 खेळाडूंची निवड केली जाईल. तत्पूर्वी या संभाव्य खेळाडूंसाठी डोहा येथे 30 डिसेंबरपासून राष्ट्रीय सराव शिबीर आयोजित केले आहे.
भारतीय संभाव्य फुटबॉल संघ – गोलरक्षक गुरूप्रितसिंग संधू, अमरिंदर सिंग, विशाल कैथ, एम. धीरजसिंग, गुरूमितसिंग चहल, बचावफळी – एन. रोशनसिंग, विकास रोमनाम, लालचुंगनेनुगा, संदेश जिनगेन, निखील पुजारी, चिंगलेसेना सिंग, प्रितम कोटल, एच. रुवाह, सुभाशिस बोस, आशिष राय, आकाश मिश्रा, मेहताब सिंग, राहुल भेके, नरेंद्र गेहलोत, अमेय रानवडे, मध्यफळी – सुरेश सिंग, रोहित कुमार, बी. फर्नांडीस, उदांतासिंग कुमाम, यासिर मोहम्मद, जेक्सनसिंग, अनिरुद्ध थापा, साहेल अब्दुल समाद, ग्लेन मार्टिन्स, कोलॅको, दीपक तंग्री, एल. राळते, विनित राय, एन. मेताई, नाओरेम, महेशसिंग, आघाडी फळी – सुनील छेत्री, रहिम अली, फारुख चौधरी, नंदकुमार शेखर, शिवशक्ती नारायणन, के. पी. राहुल, ईशा पंडीता, मानवीर सिंग, के. नासिरी, एल. चेंगटे, गुरुकिरातसिंग, विक्रम प्रतापसिंग, बिपीनसिंग, पी. गोगोई आणि एम. जेरी.









