संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मिळाले बहुमत : राजकीय अस्थिरतेला तात्पुरता विराम
वृत्तसंस्था/ बँकॉक
अनुभवी राजकीय नेते अनुतिन चार्नविराकुल हे थायलंडचे पंतप्रधान होणार आहेत. संसदेत शुक्रवारी झालेल्या मतदानात त्यांनी विजय मिळविला आहे. भुमजैथाई पार्टीचे नेते अनुतिन यांनी 492 सदस्यीय कनिष्ठ सभागृहात 247 हून अधिक मते प्राप्त केली. राजा महा वजिरालोंगकोर्न यांच्याकडून औपचारिक नियुक्ती झाल्यावर अनुतिन हे पंतप्रधानपद ग्रहण करणार आहेत.
पॅटोंग्टर्न शिनावात्रा यांच्यानंतर अनुतिन हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत. मागील आठवड्यात थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने फ्यू थाई पार्टीच्या नेत्या पॅटोंग्टर्न शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून हटविले होते. कंबोडियाचे सिनेट अध्यक्ष हुन सेन यांच्यासोबत फोनवर केलेल्या संभाषणामुळे त्यांना हे पद गमवावे लागले. थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमेवरून हिंसक वाद सुरू असताना हे संभाषण झाले होते. या संभाषणाला राजकीय नैतिकतेच्या नियमांचे उल्लंघन मानले गेले.
अंतरिम सरकार चालविणाऱ्या फ्यू थाई पार्टीने मंगळवारी संसदेचे सभागृह विसर्जित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु राजाच्या सल्लागारांच्या एका विशेष समितीने ही विनंती नाकारल्याचे काळजीवाहू पंतप्रधानांनी सांगितले होते. तर माजी अॅटर्नी जनरल आणि माजी न्यायमंत्री चायकासेम नीतिसीरी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करणार असल्याची घोषणा फ्यू थाई पार्टीने गुरुवारी केली होती. तर चायकासेम यांनी निवड झाल्यास संसदेत शपथ घेतल्यावर त्वरित सभागृह विसर्जित करणार असल्याचे म्हटले होते.
अनुतिन चार्नवीराकुल कोण?
अनुतिन हे यापूर्वी फ्यू थाई पार्टीच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. तर त्यापूर्वी माजी पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांच्या सैन्याचे समर्थनप्राप्त सरकारमध्येही ते सामील होते. गांजासेवनाला गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्यासाठी अनुतिन यांना ओळखले जाते.
सभागृह विसर्जित करत निवडणूक
अनुतिन हे पंतप्रधान झाल्याच्या 4 महिन्यांनी संसदेचे सभागृह विसर्जित करत सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार असल्याचा दावा भूमजैथाई पार्टीने केला आहे. पीपल्स पार्टीकडून समर्थनाच्या बदल्यात ही अट ठेवण्यात आली होती. अनुतिन यांना पंतप्रधान स्वीकारल्यावर राज्यघटनेत बदलावरून जनमत चाचणी करवावी लागेल, ज्यात एक निवडलेली संविधानसभा राज्यघटनेचा नवा मसुदा तयार करेल असे पीपल्स पार्टीचे म्हणणे आहे.









