फ्रेंच दूतावासाने ट्विट करत दिली माहिती
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असते. आलिया भट्टने मेट गाला 2023 मध्ये पदार्पण केल्यावर आता अनुष्का कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण करणार असल्याचे समजते. अनुष्का शर्मा कान्स चित्रपट महोत्सवातील महिलांना सन्मानित केल्या जाणाऱ्या सोहळ्यात सहभागी होणार आहे. या सोहळ्यात अनुष्कासोबत जगप्रसिद्ध अभिनेत्री केट विन्स्लेट देखील दिसून येणार आहे.

मागील वर्षी दीपिका पदूकोनने कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर स्वत:च्या सौंदर्याने भुरळ पाडली होती. दीपिका कान्स ज्युरीमध्ये सामील होती. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनॅन यांनी ट्विटरवर विराट कोहली आणि अनुष्कासोबत एक छायाचित्र शेअर करत अनुष्का कान्समध्ये सामील होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
कान्स चित्रपट महोत्सवात यापूर्वी दीपिका, ऐश्वर्या राय, सोनम कपूर आणि अन्य बॉलिवूड कलाकारांनी भाग घेतला आहे. कान्स चित्रपट महोत्सव यंदा 16 मे ते 27 मेपर्यंत आयोजित केला जाणार आहे. अनुष्का मागील काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. तिने चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली असून यांतर्गत अनेक प्रोजेक्ट्स तिने हाती घेतले होते.









