अनुष्का शेट्टी ही दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये स्वत:च्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनुष्काला तिच्या बहुमुखी अभिनयक्षमतेसाठी ओळखले जाते. देशभरात तिचे कोट्यावधी चाहते आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा चित्रपट ‘बाहुबली’मुळे उत्तर भारतातही तिला ओळख निर्माण करता आली होती. यानंतर तिच्या लोकप्रियतेत जबरदस्त वाढ झाली आहे. आता तिच्या आगामी चित्रपटासंबंधी माहिती समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
अनुष्काने स्वत:च्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यातील एक आहे ‘भागमती’. 2018 मध्ये प्रदर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. हा एक भयपट होता, ज्याची कहाणी जी. अशोक यांनी लिहिली होती आणि त्यांनीच याचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. चित्रपटात अनुष्काने एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. दिग्दर्शक अशोक यांनी या सीक्वेलविषयी माहिती दिली आहे.
अनुष्का या सीक्वेलमध्ये अधिक रंजक आणि शक्तिशाली अवतारात दिसून येणार आहे. चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सुरू झाले आहे. 2025 च्या प्रारंभी याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. हा चित्रपट युव्ही क्रिएशन्स या बॅनर अंतर्गत निर्माण केला जाणार असल्याचे अशोक यांनी सांगितले.
अनुष्का यापूर्वी ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’ या चित्रपटात दिसून आली होती. सध्या ती ‘घाटी’ आणि स्वत:चा पहिला मल्याळी चित्रपट ‘कथानार-द वाइल्ड सॉर्सेसर’वर काम करत आहे. हा एक फॅन्टसी थ्रिलर चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन रोजिन थॉमस करत आहेत.