महिलांविरोधातील गुन्ह्यात राजस्थान नंबर-1’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवार, 22 जुलै रोजी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार प्रहार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राजस्थान सरकारने महिला आणि पुरूष असा भेद करू नये असे बजावतानाच अशोक गेहलोत राजस्थानमधील वाढत्या गुन्ह्यांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी केला.
देशातील काही राज्यांमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक राज्यांमध्ये त्याविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. बिहारमधील बेगुसरायमध्ये जे घडले ते आपल्यासमोर आहे, मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. आता महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवल्याबद्दल आपल्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री राजेंद्र गुढा यांची हकालपट्टी केली, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
गांधी परिवाराची जबाबदारी नाही का?
राजस्थानची कायदा आणि सुव्यवस्था ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? राजेंद्र गुढा यांच्या वक्तव्यानंतर ते राजीनामा देणार की नाही? अशोक गेहलोत यांना राजस्थानातील घटनांची लाज वाटते की नाही? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि गांधी घराण्यातील मान्यवरांनी राजस्थानची जबाबदारी विसरली आहे काय? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राजस्थान सरकारवर आगपाखड केली.
मणिपूर मुद्द्यावरही स्पष्टीकरण
याचदरम्यान केंद्रीय मंत्र्यांना विचारण्यात आलेल्या मणिपूरसंबंधीच्या प्रश्नावरही स्पष्ट भाष्य केले. भाजप सरकार मणिपूर आणि महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीवर संसदेत चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहे. विरोधी पक्षांनाच या विषयांवर चर्चा करायची नाही, असा आरोप त्यांनी केला.








