वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना पुन्हा एकदा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 2025-29 च्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश बॉक्सिंग असोसिएशनने अनुराग यांना नामांकित केले होते आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी दोन प्रतिनिधींपैकी एक म्हणून त्यांची निवड केली होती. तथापि, गेल्या एप्रिलमध्ये जागतिक बॉक्सिंग फेडरेशनने नियुक्त केलेल्या अंतरिम समितीने जाहीर केलेल्या 66 सदस्यीय मतदार यादीतून ठाकुर यांचे नाव वगळण्यात आले आहे. जागतिक बॉक्सिंगने मान्यता दिलेल्या घटनेच्या कलम 20 नुसार, अनुराग यांचे नामांकन वैध नाही, असे अंतरिम समितीने स्पष्ट केले आहे.









