अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय : चार्ली कर्कच्या हत्येशी कनेक्शन
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एंटीफा’ला ‘प्रमुख दहशतवादी संघटना’ घोषित पेले आहे. ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्कच्या हत्येच्या काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला. एंटीफाला वित्तपुरवठा करणारे लोक आणि संस्थांची कठोर चौकशी होईल. एंटीफा एक धोकादायक आणि डाव्या विचारसरणीची आपत्ती असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी पेले आहे. एंटीफाचे पूर्ण नाव ’एंटी-फॅसिस्ट’ आहे. हा डाव्या विचारसरणीच्या समुहांचे एक नेटवर्क आहे. याचे सदस्य उजव्या विचारसरणी आणि कथित फॅसिस्टवादी शक्तींना विरोध करतात. ट्रम्प यांनी 5 वर्षांपूर्वी एंटीफाला दहशतवादी संघटना घोषित करणार असल्याचे म्हटले होते, परंतु आता हे पाऊल औपचारिक स्वरुपात उचलण्यात आले आहे.
चार्ली कर्कची हत्या
चार्ली कर्क हा टर्निंग-पॉइंट यूएसएचा सह-संस्थापक होता. त्याची 10 सप्टेंबर रोजी यूटा व्हॅली विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. 31 वर्षीय कर्कवर गोळी झाडून हल्लेखोर गर्दीचा फायदा उचलत फरार झाला होता. पोलिसांनी त्यानंतर 22 वर्षीय टायलर रॉबिन्सनला हत्येप्रकरणी अटक केली आहे. कर्कच्या हत्येमागे एंटीफाचा हात असल्याचा आरोप होत आहे.
एंटीफा वादग्रस्त का?
एंटीफा विकेंद्रीत डाव्या विचारसरणीचे नेटवर्क आहे. याच्या प्रतिकात 1917 च्या रशियन क्रांतीचा लाल झेंडा आणि 19 व्या शतकातील अराजकतावाद्यांचा काळा झेंडा सामील आहे. एंटीफाचे सदस्य उजव्या विचारसरणीच्या विरोधात निदर्शने करतात आणि सोशल मीडिया, सिग्नल यासारख्या मेसेजिंग अॅप्स आणि एन्क्रिप्टेड नेटवर्कद्वारे स्वत:च्या कारवाया करत असतात. एंटीफाला अमेरिकेत वादग्रस्त संघटना म्हणून ओळखले जाते.









