एकाचवेळी 20 ठिकाणी सुरक्षादलांकडून शोधमोहीम
वृत्तसंस्था/ जम्मू
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या घनदाट जंगलांपासून उंच पर्वतीय भागापर्यंत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी 20 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी व्यापक स्तरावर शोधमोहीम हाती घेतली आहे. नव्या मोहिमेद्वारे जम्मू विभागात मागील वर्षी अनेक हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. ही शोधमोहीम दहशतवादी कारवाया रोखणे आणि पाकिस्तानातील म्होरक्यांच्या इशाऱ्यावर जम्मू विभागात दहशतवाद फैलावण्याचा होत असलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राबविण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलांसमवेत अनेक सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबविली जात आहे. शोधपथकांची नजर टाळून दहशतवादी अन्यत्र पसार होऊ नयेत म्हणून एकाचवेळी अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात या शोधमोहिमेला आणखी तीव्र करण्यात येणार आहे. सर्वाधिक शोधमोहीम चेनाब खोरे क्षेत्रातील किश्तवाड, डोडा आणि रामबन जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. पीर पंजार क्षेत्राच्या सीमावर्ती जिल्हे राजौरी आणि पुंछमध्ये 7 ठिकाणी शोध घेतला जात आहे. उधमपूर जिल्ह्यात तीन, रियासीमध्ये दोन आणि जम्मूमध्ये एका ठिकाणी मोहीम राबविली जात आहे. ही शोधमोहीम उन्हाळ्यापूर्वी क्षेत्रावर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या कवायतीचा हिस्सा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी अलिकडेच कथुआ, डोडा आणि उधमपूर जिल्ह्यांच्या त्रिकोणी संगमावर स्थितीत वसंतगढच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा दौरा करत व्यापक आढावा घेतला होता. यानंतरच ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसमध्ये तैनात जवानांशी चर्चा करत शांतता अन् सुरक्षा राखण्यासाठी त्यांच्या अथक प्रतिबद्धतेचे कौतुक केले होते. स्थानिक लोकांची सुरक्षा अन् कल्याणाला सर्वोच्च प्राथमिकता असावी असे आवाहन त्यांनी केले होते.
जम्मू क्षेत्रात दहशतवादी कारवाया
दहशतवाद्यांनी 2021 पासून राजौरी अन् पुंछ येथे घातक हल्ले केल्यावर मागील वर्षी जम्मू क्षेत्रातील 6 अन्य जिल्ह्यांमधील स्वत:च्या कारवाया वाढविल्या होत्या. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 18 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. तर 26 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यादरम्यान सुरक्षा दल आणि पोलिसांनी 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. परंतु मागील काही वर्षांच्या तुलनेत 2024 मध्ये पीर पंजालच्या राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांमधील दहशतवादी कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. पण रियासी, डोडा, किश्तवाड, कथुआ, उधमपूर आणि जम्मू येथे झालेले दहशतवादी हल्ले सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचे विषय ठरले आहेत.









