पोलीस आयुक्तांची माहिती : संशयितांची होणार तपासणी, शस्त्रे बाळगणाऱ्यांवर राऊडीशीट उघडणार
बेळगाव : खिडकीच्या सीटवरून विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ तयार करण्यात आले असून गुरुवारपासून हे स्क्वॉड कार्यरत होणार आहे. कायदा हातात घेऊन शस्त्रे बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. बुधवारी रात्री पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, बुधवारी सकाळी घडलेली घटना धक्कादायक आहे. केवळ बसमधील खिडकीच्या सीटवरून चाकूहल्ला करण्याचा प्रकारच धक्कादायक आहे. त्यामुळे आपण ही घटना गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत असल्याची त्यांनी सांगितले.
शहरात चाकूहल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ तयार करण्यात आला आहे. या स्क्वॉडमध्ये सात अधिकारी व पोलीस असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी फिरून ज्यांच्यावर संशय येईल त्यांची झडती घेण्यात येणार आहे. चाकू किंवा इतर शस्त्रे आढळून आल्यास त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर तर दाखल होणारच राऊडीशीटही उघडण्यात येणार आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी बिट सिस्टममध्ये बदल करण्यात येणार आहे. बंद घरांविषयी संबंधितांनी कंट्रोल रुमला माहिती दिल्यास रात्रीच्यावेळी किमान दोनवेळा पोलीस त्या घराला भेटी देणार आहेत. आपण पोलीसप्रमुख असताना हा उपक्रम राबविला होता. आता बेळगावातही चोऱ्या रोखण्यासाठी बीट व्यवस्था आणखी मजबूत करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
चौथ्या रेल्वेगेटजवळ उड्डाणपुलाच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात
अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेटजवळ उड्डाण पूल उभारण्याच्या कामाला शुक्रवार दि. 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. 19 जून 2026 पर्यंत तब्बल एक वर्ष हे काम चालणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. अनगोळहून बेम्कोकडे जाणारी वाहतूक अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक, हरी मंदिर रोड, अनगोळ नाका, तिसऱ्या रेल्वेगेट पुलावरून खानापूर रोडला वळविण्यात येणार आहे. खानापूरहून अनगोळकडे येणारी वाहतूक बेम्को सर्कलपासून तिसरे रेल्वे गेट अनगोळ नाका, हरिमंदिर रोड मार्गे वळविण्यात येणार आहे. वर्षभर वाहतूक व्यवस्थेत बदल असणार आहे, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.









