सीबीटी परिसरात विद्यार्थ्यांच्या बॅगची तपासणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बसमध्ये प्रवास करताना खिडकीच्या सीटवरून झालेल्या भांडणानंतर बाळेकुंद्री बी. के. येथील एका विद्यार्थ्यावर दोन दिवसांपूर्वी सीबीटीवर चाकू हल्ला झाला होता. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अँटी स्टॅबिंग स्क्वॉड सुरू केले आहे. या स्क्वॉडने दोन दिवसांपासून आपले काम सुरू केले आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सीबीटी मध्यवर्ती बसस्थानकासह प्रमुख ठिकाणी या स्क्वॉडमधील अधिकारी व पोलिसांनी तपासणी केली. विद्यार्थी व तरुणांना अडवून त्यांच्या बॅग तपासण्यात आल्या.
मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांचे सहकारी या कारवाईत सहभागी झाले होते. सीबीटीवर चाकू हल्ल्याची घटना घडल्याने खासकरून विद्यार्थी व तरुणाईला अडवून त्यांच्या बॅग तपासण्याबरोबरच धारदार शस्त्रs बाळगणे कसे चुकीचे आहे, याविषयी पोलिसांनी त्यांना माहितीही दिली.
बॅगमध्ये शस्त्रs ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी चाकू हल्ल्याचे प्रकार रोखण्यासाठी या नव्या पथकाची स्थापना केली असून सातत्याने या पथकातील अधिकारी व पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी संशयितांना अडवून तपासणी करणार आहेत.
दुचाकीच्या डिक्कीत आढळला जांबिया
न्यू गांधीनगरच्या युवकाला अटक : अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची पहिली कारवाई
सीबीटीवर दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्याला भोसकल्याच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या सूचनेवरून अस्तित्वात आलेल्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने जांबिया बाळगणाऱ्या युवकाला अटक केली आहे. पथकाची स्थापना केल्यानंतर केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गांधीनगरजवळील सांबरा उ•ाणपुलाखाली शुक्रवारी सायंकाळी तपासणी करताना एका युवकाजवळ जांबिया आढळून आली आहे.
अप्सर अब्दुलरशीद शेख (वय 42, रा. मुल्ला गल्ली, न्यू गांधीनगर) असे त्या युवकाचे नाव आहे. केए 22, ईए 1869 क्रमांकाच्या डीओ दुचाकीवरून अप्सर जात होता. वाहने तपासताना माळमारुती पोलिसांनी अप्सरला अडवून त्याने दुचाकीमध्ये काही ठेवले आहे का? हे पाहण्यासाठी डिक्की उघडली असता डिक्कीत धारदार जांबिया आढळून आले. त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 97 व भारतीय शस्त्रास्त्र कायदा 27 (1) अन्वये एफआयआर दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.









