15 ते 30 सप्टेंबरपर्यंत मोफत : पाळीव अन् भटक्या श्वानांनाही देणार लस : संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : रेबीजला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. कुत्र्या-मांजरांना ही लस टोचली जाणार असून संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन खात्याने केले आहे. अलीकडे कुत्र्यांचे जीवघेणे हल्ले वाढले आहेत. दरम्यान, पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबीजची लागण होते. यासाठी खबरदारी म्हणून खात्याने तब्बल पंधरा दिवस मोफत लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 9 ते 1 या वेळेत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन आपल्या कुत्र्या-मांजरांना लस टोचून घ्यावी. जिल्ह्यात 77 हजार 801 इतकी पाळीव कुत्र्यांची संख्या आहे. तर भटक्या कुत्र्यांची संख्याही अधिक आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांकडून हल्ले वाढू लागले आहेत. शहरात मागील महिनाभरात तिघा जणांवर कुत्र्यांनी हल्ले करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. यंदा पाळीव कुत्र्यांबरोबरच दवाखान्यात भटक्या कुत्र्यांना घेऊन आल्यास त्यांनाही लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील बेळगाव, अथणी, चिकोडी, रायबाग, गोकाक, मुडलगी, निपाणी, कागवाड, हुक्केरी, सौंदत्ती या सर्वच तालुक्यांमध्ये ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे. त्याबरोबर सध्या रेबीजबाबत शाळा-महाविद्यालयीन स्तरावर जागृतीचे काम देखील सुरू आहे. दरम्यान, रेबीजचा प्रसार कसा होतो? रेबीज प्रतिबंधक लस आणि तात्काळ उपचार याबाबतही माहिती दिली जात आहे. विशेषत: रेबीज रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे स्थानिक प्रजातीबरोबरच विदेशी श्वान पाळणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जर्मन शेफर्ड, लॅब्रेडोर, डॉबरमॅन, मुधोळ हाऊंड, पामेरियन आदी जातीचे कुत्रे वाढले आहेत. या सर्व श्वानांना खबरदारी म्हणून अँटीरेबीज लस दिली जाणार आहे.
श्वानांना लस टोचून घ्यावी
रेबीज रुग्णांची संख्या शून्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्वत्र जागृती केली जाणार आहे. त्याबरोबर 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोफत लसीकरण केले जाणार आहे. सर्व श्वानपालकांनी खबरदारी म्हणून श्वानांना लस टोचून घ्यावी. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
डॉ. राजीव कुलेर (पशुसंगोपन सहसंचालक)









