प्लास्टिक जप्त : 44 हजारांचा दंडही वसूल
बेळगाव : महापालिकेच्यावतीने प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्याचे सत्र सुरूच असून मंगळवारी मनपाच्या पथकाने 550 किलो प्लास्टिक जप्त करून व्यापाऱ्यांकडून 44 हजार रुपयांचा दंड वसूल केला. यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्लास्टिकविरोधी मोहीम राबविताना कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृतीही केली. गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध ठिकाणी प्लास्टिकविरोधी मोहीम राबविली जात आहे. अनेकवेळा प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारीही 550 किलो प्लास्टिक जप्त करून 44 हजार रुपयांचा दंड आकारल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली आहे. बाजारपेठेसह उपनगरांमध्येही मंगळवारी धाडी घालण्यात आल्या. प्लास्टिक पिशव्या वापरू नका, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्लास्टिक वापरत असाल तर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवरही धाड घालण्यात आली. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या पथकामध्ये महानगरपालिकेचे 14 आरोग्य निरीक्षक व दोन अभियंत्यांचा समावेश आहे.









