धमक्याही मिळाल्याचे स्पष्ट : पोलिसांकडून तपास
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये राहणारे भारतीय-अमेरिकन व्यावसायिक आणि खलिस्तानवादी विचारांना विरोध करणारे सुखी चहल यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांचे जवळचे मित्र जसपाल सिंग यांनी यासंबंधीची माहिती दिली. 31 जुलै रोजी सुखी चहल यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या घरी जेवणासाठी बोलावले होते. जेवणानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे भारत समर्थक समुदायात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य बाहेर येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
‘द खालसा टुडे’चे संस्थापक आणि सीईओ सुखी चहल यांना खलिस्तानी समर्थकांकडून सतत धमक्या येत होत्या. तरीही, ते त्यांच्या मुद्यांवर ठाम राहिले, असे जसपाल यांनी सांगितले. सुखी पूर्णपणे निरोगी होते. त्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुखी खलिस्तानी कारवायांवर जोरदार टीका करत होते. 17 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या खलिस्तान जनमत चाचणीलाही ते उघडपणे विरोध करत होते. सुखी भारतीय स्थलांतरितांना अमेरिकेतील कायद्यांचे पालन करण्याचा आणि गुह्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असत. अलीकडेच त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ‘अमेरिकेत कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. गुन्हा केल्यास व्हिसा रद्द होऊ शकतो आणि परतणे कठीण होऊ शकते.’ असे ट्विट केले होते.
भारत-अमेरिकेतील संबंधांना चालना देण्यात सक्रिय
सुखी चहलचा जन्म भारतातील पंजाबमधील मानसा जिह्यात झाला. 1992 मध्ये ते अमेरिकेत गेले. त्यांनी 1988 ते 1992 पर्यंत लुधियानातील गुरु नानक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. ते व्यवसायाने संगणक अभियंता होते. त्यांनी स्टॅनफोर्ड आणि यूसी बर्कले येथे संगणक आणि व्यवस्थापनाशी संबंधित विशेष अभ्यासक्रम देखील पूर्ण केले. त्यांनी सिलिकॉन व्हॅलीच्या अनेक कंपन्यांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि सल्लागार म्हणून काम केले आहे. ते ‘द खालसा टुडे’चे संस्थापक आणि अध्यक्ष देखील होते. सुखी हे सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय होते. तसेच हिंदू, शीख आणि ज्यू समुदायांमध्ये एकता वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.









