ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर लाँगमार्च
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशची राजधानी ढाका येथे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) रविवारी भारताच्या निषेधार्थ भारतीय उच्चायुक्तालयासमोर लाँगमार्च काढला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच रोखला. यानंतर बीएनपीच्या प्रतिनिधी गटाला पोलिसांच्या मदतीने भारतीय उच्चायुक्तांना निवेदन देण्याची परवानगी देण्यात आली. बीएनपीचे संयुक्त महासचिव रुहुल कबीर रिझवी यांनी या आंदोलनादरम्यान भारतविरोधी वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले आहे.
या आंदोलनादरम्यान सकाळपासूनच भारतीय उच्चायुक्तालयासमोर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लष्कराच्या तीन तुकड्यांसह पोलीसही येथे हजर होते. यावेळी काही सामान्य प्रवाशांनाही थांबवून संशय आल्यास त्यांची चौकशी केली जात होती. या लाँगमार्चवेळी बीएनपीचे नेते रिझवी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. भारत प्रत्येक पावलावर बांगलादेशला नुकसान पोहोचवू शकतो. शेख हसीना बांगलादेशातील लोकांना आवडत नसतानाही भारताने त्यांना आश्रय दिला. भारत कोणाशीही मैत्री करू शकत नाही, असे बीएनपीचे संयुक्त महासचिव रुहुल कबीर रिझवी म्हणाले. तसेच भारताने चितगावची मागणी केल्यास पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा परत घेऊ, असेही ते बरळले आहेत.
भारतात जातीयवाद खूप आहे. दिल्लीच्या आशीर्वादाने शेख हसीना यांनी 16 वर्षे बांगलादेशावर राज्य केले. वकील अलिफच्या हत्येबाबत भारतानेही काहीही सांगितले नाही, असेही रिझवी पुढे म्हणाले. चितगावमध्ये 26 नोव्हेंबर रोजी चिन्मय प्रभू यांच्या समर्थनार्थ निदर्शनादरम्यान वकील सैफुल इस्लाम उर्फ अलिफ यांची हत्या झाली होती. सदर वकिलाचा मृत्यू कसा झाला हे कळू शकलेले नाही









