आशिष आडिवरेकर,कोल्हापूर
लाचलुचपतने नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच केलेल्या तक्रारींची घेतलेली तत्काळ दखल यामुळे लाचलुचपतचा धसका सरकारी कार्यालयातील लाचखोरांना चांगलाच बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा वर्षभरात केवळ 21 लाचखोरच लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. गेल्या 4 वर्षांचा विचार केला असता यंदा प्रथमच ही आकडेवारी कागदोपत्री तरी कमी आलेली दिसत आहे.
सरकारी कार्यालयातील काम म्हणजे आर्थिक वजन असे समीकरण बनले आहे.आर्थिक वजन ठेवल्यानंतर कामाला आपोआपच पाय फुटतात.नाही तर फाईल गहाळ होणे,त्यामध्ये त्रुटी निघणे असे प्रकार घडवून आणले जातात.आणि यामुळे संबंधित नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. किरकोळ कामासाठीही सर्वसामान्यांची अडवणूक करणारी एक टोळीच सरकारी कार्यालयांमध्ये ऍक्टीव्ह असते. मात्र लाचलुचपत विभागाने गेल्या काही वर्षात केलेल्या धडक कारवाया यामुळे लाचखोरीचे प्रमाण कागदोपत्री तरी कमी असल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षभरात केवळ 21 कारवाया झाल्या असून 24 सरकारी अधिकारी,कर्मचारी व 4 पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत.
2 हजारापासून 45 लाखापर्यंत लाचेची मागणी
यंदा लाच मागणीच्या रकमेतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याने सरपंचांच्या मदतीने 11 लाख रुपयांची लाच मागून 5 लाख 50 हजार रुपये स्वीकारले.तर पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय कारंडे व पोलीस नाईक किरण गावडे याच्या मदतीने 25 लाख रुपयांची मागणी करुन 10 लाख रुपये स्विकारताना जेरबंद करण्यात आले.ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई याने 14 लाख रुपयांची मागणी करुन 5 लाख रुपये स्वीकारले तर पोलीस नाईक जॉन तिवडे याने 1 कोटी रुपये मागितल्याचेही यंदा उघडकीस आले आहे.
महसूल,पोलीस विभाग नेहमीच आघाडीवर
लाचखोरीमध्ये महसूल व पोलीस विभाग नेहमीच आघाडीवर राहिला आहे. यंदाही या दोन विभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात कारवाया झाल्या आहेत. महसूल विभागा 2 तर पोलीस विभागात 8 कारावाया झाल्या आहेत. तर ग्रामविकास खात्यामध्ये 4 कारवाया करण्यात आल्या आहेत.
केस पुरुष महिला खासगी
महसूल 2 3 0 1
पोलीस 7 8 0 1
आरोग्य 2 2 1 0
उद्योग व उर्जा 1 1 0 0
ग्रामविकास 4 4 0 2
महापालिका 3 4 0 0
शिक्षण 2 2 0 0
एकूण 21 23 1 4
लाचलुचपतचा धसका का?
तक्रारदाराचे नांव गोपनीय
कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही
सोशल मिडीया, हेल्पलाईन नंबरचा आधार
गुन्हेसिद्धतेचे प्रमाण वाढले
सरकारी साक्षीदारांमुळे फितुरी टळली
भक्कम पुराव्यांचा आधारकाम मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा
घटलेल्या कारवायांचे प्रमाण
2018 34
2019 31
2020 27
2021 25
2022 21
सरकारी कार्यालयामध्ये कामासाठी कोणत्याही नागरिकांची लाच मागणी संदर्भात अडवणूक केली जात असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार द्यावी. तक्रारदारांना प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य नसल्यास त्यांनी 1064 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा किंवा लाचलुचपत विभागाच्या संकेतस्थळावर भेट देऊन आपली तक्रार नोंदवावी लाचलुचपतचे अधिकारी कर्मचारी आपल्याकडे येतील तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक
Previous Articleजिह्यातील 5 हजार कुटुंब होणार गॅस सिलेंडरमुक्त
Next Article थेटपाईपलाईन पूर्ण होईना, ‘शिंगणापूर’ची गळती थांबेना









